
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना मी त्यांना टोमणा लगावत नाहीये, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख कधीकाळचे राजकीय मित्र असा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीत अंतर झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
खासदार संजय राऊत यांनी समारोपाच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा सवाल केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना मित्र म्हणून एक सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अलिकडे तुमची चर्चा झालीय का? असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर, आता तरी चर्चा झाली नाही. सुरुवातीला जाऊन त्यांना गुच्छ दिला होता. आहेत आता मुख्यमंत्री. मानो या ना मानो. तुमच्याकडून चांगलं व्हावं ही अपेक्षा आजही आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बदनाम फडणवीस होत आहेत…
उलटं माझं म्हणणं आहे, त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी , लफडी आणि कुलंगडी बाहेर येत आहेत, त्या त्यांनी मोडीत काढल्या पाहिजे. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो. त्यांनी हे माझं मत… हा टोमणा नाही… हा सल्ला आहे. टोमणा नाही आधीच सांगतो. त्यांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढल्या पाहिजे. नीती वगैरे या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही आजूबाजूला चाललं आहे… त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं काम आहे. काल बॅग दिसली, जमीन दिली जाते, 3 हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सर्व चालले आहे. पण राज्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम फडणवीस होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे. दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
जागे व्हा आणि जागे राहा
महाराष्ट्राला भविष्य आहे का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी होय असं म्हटलं. भविष्य नक्कीच आहे. खचून कसं चालेल? लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, तसा तो परत जागा झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले, मराठी माणूस बाहेर काढला जातो, आता नाही जाग आली तर आपले डोळे कधीच उघडले जाणार नाही. जागे व्हा आणि जागे राहा. कुणावर अन्याय करू नका. पण कुणी अन्याय केला तर सहन करू नका. भेदाभेद गाडून एकत्र या, असं आवाहन त्यांनी केलं.
हे राजकारण हाणून पाडा
मराठा समाजाला भडकवलं जातं. भाजपची एक नीती आहे, राज्यातील सर्वात मोठ्या समाजाला भडकवायचं. तो पेटला तर त्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाज आहेत, त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं. पटेलांना भडकवलं आणि पटेलांच्या व्यतिरिक्त इतरांना चिथवून एकत्र आणून सत्ता घेतली. हरियाणात जाट समाजाला भडकवलं. भाजप सत्तेतून गेलीच असं चित्र हरयाणात होतं. जाट तिरीमिरीने उभा राहिला आणि इतरांना जाटांची भीती दाखवून, एकवटून भाजपने सत्ता आणली. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे केलं. आपल्याला वाटलं हिंदू-मुस्लिम. पण त्यांनी मराठा आणि मराठेत्तर केलं. त्यांच्या विरोधात ओबीसी उभा केला. सत्ता आणली. मराठी भावंडांमध्येच समाजाच्या भिंती उभ्या करून पोळी भाजायची हे राजकारण हाणून पाडा, असंही ते म्हणाले.