तुम्ही एकनाथ शिंदे यांची लाज घालवली; अजितदादा गटाच्या नेत्याने घेतला रामदास कदम यांचा समाचार

मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाल्याचं दिसतंय. संविधान बदलाच्या प्रचारामुळे मते कमी पडली. पण आता हा सगळा गैरसमज दूर केला जाईल, असं सांगतानाच अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहिला शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता. सत्तेत आलाच नसता, अशा शब्दात अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना सुनावले.

तुम्ही एकनाथ शिंदे यांची लाज घालवली; अजितदादा गटाच्या नेत्याने घेतला रामदास कदम यांचा समाचार
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2024 | 8:45 PM

अजित पवार यांना महायुतीत घेतल्याबद्दल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा लेट आले असते तर आपल्याला 9 मंत्रीपदे मिळाली असती, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. रामदास कदम यांचं हे विधान अजितदादा गटाला चांगलंच झोंबलं आहे. अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्हाला भाषण करण्याची सन्मानानं संधी दिली तर तुम्ही काहीही बरळणार? आम्ही ऐकून घ्यायला मोकळे नाही. तुमच्या मतदारसंघात अनंत गीते यांना लीड मिळाली आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांची लाज घालवली आहे, असा जोरदार हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला आहे.

उमेश पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला. आम्हीही काहीही ऐकून घेणार नाही. ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. भाजप आणि शिवसेनेची मेजॉरीटी असतानाही अजित पवार यांना सोबत घेतलं याचं आधी चिंतन करा. सुनील तटकरे हे रायगडचे खासदार होते. ती आमची नैसर्गिक जागा होती, असं सांगतानाच तटकरे यांना निवडून आणण्यात रामदास कदम यांचं काहीही योगदान नाही. उलट तुमच्या मतदारसंघात ठाकरे गटाला लीड आहे. तुम्ही तर शिंदेंचीच लाज घालवली, असा घणाघाती हल्लाही उमेश पाटील यांनी चढवला.

तर मंत्री झाले असते

दापोली हा रामदास कदम यांचा मतदारसंघ आहे. त्यांचा मुलगा तिथे आमदार आहे. त्या ठिकाणी अनंत गीते आघाडीवर आहेत. दापोली-खेडमधून 8 हजार 432 पेक्षा जास्त मते अनंत गीतेंना मिळाली, हे वास्तव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांच्या जीभेला लगाम घातला पाहिजे. रामदास कदम यांनी संयमाने भूमिका मांडली पाहिजे, असं सांगतानाच रामदास कदम यांनी पात्रता असती तर ते आज मंत्री असते, असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

तुमची पात्रता जेवढी…

रामदास कदम यांनी काल आक्षेपार्ह शब्द वापरले. महायुतीत चांगला समन्वय राहिला पाहिजे. एकसंघ भूमिका असली पाहिजे. महायुतीसोबत जाणं ही आमची भूमिका असताना रामदास कदम उगाच बेजबाबदार विधानं करत आहेत. तुमची पात्रता जेवढी आहे, त्या पात्रतेत मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ठेवलं आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मंत्री केलं नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

मीठाचे खडे बाजूला करा

मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांना जबाबदारीने बोलण्याची समज दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आता मीठाचे खडे बाजूला केले पाहिजे. अन्यथा दूध नासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अजित पवार यांच्या संदर्भात बातम्या पेरल्या जात आहेत. अजितदादांना महत्त्वाचा रोल दिला जाऊ शकतो म्हणून हे सगळे प्रकार मित्र पक्षांकडून सुरू आहेत, अशी शंका यायला लागली आहे, असं सांगतानाच अजित पवार यांच्यामुळे नुकसान झाल्याची दिल्लीतील बैठकीतही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us