Tukaram Ombale: मोठा संताप! कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम ओंबळे यांच्या स्मारक कामात घोटाळा? मुलीच्या आरोपांनी मोठी खळबळ
Tukaram Ombale Memorial Allegations: पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्या मुलीने केला आहे. त्यावरून एकच गदारोळ उठला आहे. काय आहे मुलीचा आरोप?

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, टीव्ही9, मराठी : 26/11 मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला शहीद तुकाराम ओंबळे यांनी पकडले होते. त्यामुळे या संपूर्ण हल्ल्याचे धागेदोरे हाती आले आणि ते जगासमोर भारताला मांडता आले. तर सातारा जिल्ह्यातील केडंबे येथे होत असलेल्या त्यांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांची मुलगी वैशाली ओंबळे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
टेंडर प्रक्रियेत घोटाळा
माझ्या वडिलांचं स्मारक त्याचं मुळ जन्मगाव केडंबे इथे होतंय मात्र या स्मारकाचेया कामातच घोटाळा झाला आहे. टेंडर प्रक्रियेतच हा घोटाळा झाला आहे. आम्ही वारंवार याबाबत आवाज उठवला पण कुणी आमचं ऐकलं नाही. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही तक्रार केली पण काही झालं नाही, आत्ता तर लोकं उघड उघड पैसे घेतले असं म्हणत आहेत, त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की आम्हाला न्याय द्या, अशी मागणी वैशाली ओंबळे यांनी केली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणातील दोषी असलेल्या आरोपींची चौकशी करा. त्यांच्यावर कारवाई करा , आणि पारदर्शन पद्धतीने वडीलाचं स्मारक बांधा. माझ्या वडिलांनी देशासाठी जीव दिला आणि त्यांच्या मागे या सगळ्या गोष्टी घडत असतील तर भविष्यात पुढच्या पिढ्यांना काय संदेश जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं सांगणं आहे की आम्हाला न्याय द्या. आज मंत्रालयात आम्ही त्यांची भेटही घेणार आहोत, अशी माहिती वैशाली ओंबळे यांनी दिली.
स्मारकाचे काम रखडले
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील केडंबे येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे काम अद्याप रखडलेले आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी 3 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मंजूर निविदा रक्कम 9 कोटी 64 लाख 486 रुपये इतकी आहे. निविदेतील अटींनुसार, आदेश मिळाल्यानंतर 24 महिन्यांत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. पण आता अकरा महिने उलटूनही स्मारकाचे साधे भूमिपूजनही झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी काही संघटनांनी मेढा तहसीलदारांना काम पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले होते. पण कार्यवाही न झाल्याने आता आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
