सीसीटीव्हीचा आधार घेऊन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; वाहने, मोबाईलसह जबरी चोरी; 8 गुन्ह्यांची दिली कबूली
पोलीस पथकाने वसई पूर्व गावराईपाडा परिसरात दोन दिवस सापळा रचून, पाळत ठेवून 25 जुलै रोजी राजेश कुमार जैस्वाल (वय 21) या आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्याकडून एक होंडा कंपनीची मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

वसई: वसई-विरार नालासोपारासह (Vasai-Virar Nalasopara Area) अन्य परिसरात वाहन, मोबाईल, आणि जबरी चोरी (Theft) करून फरार होणाऱ्या तीन सराईत चोरट्याला सीसीटीव्ही आधारे (CCTV) पाळत ठेवून, पकडण्यात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यानी पेल्हार, नवघर, आचोळा, नालासोपारा, वालीव, तुलिंज या पोलीस ठाण्यातील 8 गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 1 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. राजेश कुमार जैस्वाल (वय 21), अभिषेक अरविंदकुमार यादव (वय 27), सचिन राकेश सिंग (वय 26) असे अटक केलेल्या चोरट्यांची नाव आहेत. हे विरार नालासोपारा येथील रहिवासी आहेत. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या (Mira-Bhayander, Vasai Virar Police Commissionerate) हद्दीत या दोन चोरट्याने मोटारसायकलवर येऊन, वाहन, रिक्षा, आणि जबरी चोरी करून फरार झाले होते.
चोरीच्या घटना वाढत असल्याने मुख्यालयातील पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, सहाय्यक फोजदार चंद्रकांत पोशिरकर, पोलीस हवालदार गोविंद केंद्रे, राजाराम काळे, शिवाजी पाटील, पोलीस अंमलदार महेश वेले, सुशील पवार, संग्राम गायकवाड, सतीश जगताप यांचे स्वतंत्र पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले होते.
मोबाईलसह वाहनांची चोरी
या पथकाने वसई पूर्व गावराईपाडा परिसरात दोन दिवस सापळा रचून, पाळत ठेवून 25 जुलै रोजी राजेश कुमार जैस्वाल (वय 21) या आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्याकडून एक होंडा कंपनीची मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून माहिती घेण्यात आल्यानंतर पुन्हा त्याने एक रिक्षा आणि दोन मोटारसायकल असा 1 लाख 27 हजाराचा मुद्देमाल देऊन, रेकॉर्डवरील 4 वाहन चोरी आणि 2 मोबाईल चोरले असल्याचीही त्यांनी कबुली दिली.
आणखी गुन्ह्यांची कबुली होणार
तसेच विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात सापळा रचून 29 जुलै रोजी अभिषेक यादव आणि सचिन सिंग या दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या तिन्ही आरोपीना वसई,विरार,नालासोपारा, मीरा भाईंदर परिसरातील 8 गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी यांच्याकडून गुन्ह्यांचा उकल होणार आहे. हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत.
