VIDEO : मुंबईत मोनोरेल स्टेशनजवळ ‘बर्निंग टँकर’चा थरार

VIDEO : मुंबईत मोनोरेल स्टेशनजवळ ‘बर्निंग टँकर’चा थरार

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : वडाळा येथे सोमवारी रात्री पेट्रोलच्या टँकरने पेट घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये टँकर चालकाचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सोमवारी रात्री 10 वाजून 45 मिनटांच्या सुमारास वडाळा परिसरातील भक्ती पार्क येथे या टँकरने पेट घेतला. मोनोरेलच्या मार्गाजवळ ही दुर्घटना घडली. हा टँकर माहूल येथून बंगळुरूला जात होता. या टँकरमध्ये 24,000 लीटर मिथेनॉल भरलेले होते.


भरधाव वेगाने जात असलेल्या या टँकरने भक्ती पार्कजवळ एका टेम्पोला धडक दिल्याने चालकाचा  टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. मिथेनॉलमुळे टँकरने पेट घेतला. हा टँकर नॅशनल कॅरीअर ट्रान्सपोर्ट कंपनीचा होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या टँकर चालकाचे नाव प्रताप मोरे (50) असल्याची माहिती आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी ए.एच. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दल तेथे दाखल झाले त्यावेळी तेथे टँकर उलटलेला दिसला. त्यात मिथेनॉल असल्यामुळे त्या टँकरने पेट घेतला असावा असा अंदाज त्यांनी वर्तवला. दरम्यान, वडाळा पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI