विक्रोळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गोळीबाराचं गूढ सहा दिवसांनी उकललं

मध्यप्रदेश आणि कर्नाटकातून गोळीबार करण्यासाठी प्रसाद पुजारीने माणसे पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे.

विक्रोळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गोळीबाराचं गूढ सहा दिवसांनी उकललं

मुंबई : विक्रोळीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबारामागे परदेशातील गँगस्टरचं कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. गँगस्टर प्रसाद पुजारीनेच (Shivsena officer Firing Accuse) चंद्रशेखर जाधव यांना संपवण्यासाठी सुपारी दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

खंडणी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा सहा दिवसांनी उलगडा झाला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या दिवशीच एका संशयित ताब्यात घेण्यात आलं होतं. मध्यप्रदेश आणि कर्नाटकातून गोळीबार करण्यासाठी प्रसाद पुजारीने माणसे पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे.

कृष्णधर शिवनाथ सिंग आणि आनंद फडतरे अशी अटक झालेल्या आरोपींची नावं असून कोर्टाने त्यांना एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.

चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे ठोस कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दहशत निर्माण करण्यासाठीच प्रसाद पुजारीने ही सुपारी दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गेल्या आठवड्यात गोळी झाडण्यात आली होती. विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगर मधील साई मंदिर परिसरात गेल्या गुरुवारी (19 डिसेंबर) सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास हा हल्ला घडला. चंद्रशेखर जाधव यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली होती. त्यांना विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसापासून चंद्रशेखर जाधव यांना धमक्या येत असल्याचं सांगितलं जात होतं. चंद्रशेखर जाधव हे शिवसेना उपविभागप्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. भरसकाळी भरवस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे विक्रोळीतील टागोर नगर परिसरात घबराट पसरली होती. Shivsena officer Firing Accuse

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI