Ajit Pawar : आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजितदादा भडकले कुणावर? म्हणाले नाक खुपसायचं काम नाही

Ajit Pawar angry : तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला.

Ajit Pawar : आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजितदादा भडकले कुणावर? म्हणाले नाक खुपसायचं काम नाही
अजित पवार भडकले
| Updated on: Aug 16, 2025 | 10:34 AM

अजित पवार यांनी सकाळीच विरोधकांना चांगलेच ठणकावले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला. पण दादा नेमके कुणावर संतापले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, चला तर जाणून घेऊयात.

पुतण्याचे टोचले कान

“आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं.राज्यात काहींना असं वाटायला लागलं आहे की, आपण फारच मोठे नेते झालो आहोत. आणि महाराष्ट्राचा सगळा मक्ता त्यांनाच दिला असे ते वागायला लागले आहेत. ठीक आहे बोलण्याचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. पण त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळावा, इतर पक्षात नाकं खुपसण्याचे काम करू नये,” असा सणसणीत टोला अजितदादांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना लगावला आहे.

रोहित पवार हे सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटावर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी यापूर्वी दोन तीन मंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. दादा गटाच्या आमदारांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली होती. त्यांच्या शेलक्या शब्दांचे मार अनेक आमदारांना बसले. त्यावरून राष्ट्रवादी गट रोहित पवार यांच्यावर तापलेला आहे. त्यातच रोहित पवारांनी काल मोठे वक्तव्य केले होते. त्यावरून आज अजितदादांनी त्यांचे कान टोचले. विशेष म्हणजे कोल्हापूर येथे त्यांनी रोहित पवारांवर टीका केली. तर सांगलीत एका कार्यक्रमात काका-पुतणे एकाच मंचावर आल्याचे दिसले.

काय म्हणाले होते रोहित पवार

सूरज चव्हाण यांचे मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांचे पद काढून घेण्यात आले. तर आता त्यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर रोहित पवार यांनी तटकरे यांच्यावर खोचक टीका केली. रोहित पवार यांनी ट्विट करत त्यावर आसूड ओढला होता. अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी काम करतो असे ते म्हणाले. शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठीच सूरज चव्हाण यांची नियुक्ती केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. तर तटकरे यांनी ते बालिश असल्याची टीका केली होती.