AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठे ‘त्या’ हातालाही विसरले नाहीत… खांद्यावर घेतलं, गुलाल उधळला… मंगेश चिवटे यांना अश्रू अनावर

मंगेश चिवटे यांनी सातत्याने मंगेश जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची भूमिका सरकारपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं कामही केलं. कोणतीही प्रसिद्धी न घेता, कोणतेही मीडिया बाईट न करता त्यांनी आपली भूमिका पार पडली.

मराठे 'त्या' हातालाही विसरले नाहीत... खांद्यावर घेतलं, गुलाल उधळला... मंगेश चिवटे यांना अश्रू अनावर
mangesh chivateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 27, 2024 | 9:10 PM
Share

नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : अखेर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष, जिद्द, मराठ्यांचा संयम, बलिदान आणि त्याग याच्या बळावर मराठ्यांना आज दिवाळी साजरी करता आली आहे. सरकारनेही संयमी मराठ्यांशी सतत संवाद सुरू ठेवला. संवादाची डोर कधीच कट होऊ दिली नाही. कधी अधिकारी, कधी वकील, कधी निवृत्त न्यायाधीश तर कधी मंत्री आणि आमदारांच्या माध्यमातून हा संवाद होत होता. मुख्यमंत्री स्वत: जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून होते. पण या कामात आणखी एक हात महत्त्वाची भूमिका बजावून गेला. या व्यक्तीनेही जरांगे यांच्याशी सातत्याने संवाद साधला. जरांगे यांच्यापुढे सरकारची भूमिका समर्थपणे मांडतानाच मराठ्यांना जे हवं ते कसं मिळेल याची काळजी घेतली. म्हणूनच जेव्हा आरक्षणाचा मार्ग मार्गी लागला तेव्हा मराठ्यांनी या व्यक्तीला अक्षरश: खांद्यावर उचलून ठेका धरला अन् गुलालाची उधळण केली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तिचं नाव आहे मंगेश चिवटे.

मूळचा पत्रकारितेचा पिंड असलेले मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य निधी गरजूपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी ते उत्तमरित्या सांभाळत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांच्यावर विश्वास टाकला. मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला.

चेहरे बदलले, चिवटे कायम

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारनेही जोरदार हालचाली सुरू केल्या. जरांगे यांना मुंबईत यावे लागणार नाही, अशा पद्धतीने सरकार पातळीवर तोडगा काढण्यास सुरुवात झाली. कुणबी नोंदी शोधण्यापासून ते सगेसोयरे शब्दांची व्याख्या करण्यापर्यंतच्या कामावर सरकारने फोकस ठेवला. दुसरीकडे जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाचा संवादही सुरू ठेवला. या प्रत्येक संवादाच्यावेळी मंगेश चिवटे हे उपस्थित राहिले. कधी मंत्र्यांसोबत जालन्यातील अंतरवलीत गेले, कधी आमदारांसोबत अंतरवलीत गेले तर कधी अधिकाऱ्यांसोबत. प्रत्येकवेळी शिष्टमंडळातील चेहरे बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले.

भोवळ आली तरी चिवटे गेलेच

मंगेश चिवटे काल दुपारीही मनोज जरांगे यांच्याशी शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी वाशीत आले होते. ही चर्चा सुरू असतानाच ऊन लागल्याने चिवटे यांना भोवळ आली. उष्णतेमुळे त्यांना कसं तरी वाटलं. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली. पण म्हणून चिवटे थांबले नाहीत. त्यांनी रात्री झालेल्या वर्षावरील बैठकीलाही हजेरी लावली.

पहाटेपर्यंत चर्चा

काल रात्री पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जीआर घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे नवी मुंबईत गेले. या शिष्टमंडळात मंगेश चिवटेही होते. रात्री अडीच वाजेपर्यंत चर्चा झाली. जरांगे यांना अध्यादेश वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर समाधान झाल्यावर मध्यरात्रीच 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. सकाळी आंदोलन मागे घेणार असल्याचंही सांगितलं.

तिथेच खांद्यावर घेतले

मंगेश चिवटे यांनी सातत्याने मंगेश जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची भूमिका सरकारपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं कामही केलं. कोणतीही प्रसिद्धी न घेता, कोणतेही मीडिया बाईट न करता त्यांनी आपली भूमिका पार पडली. जेव्हा सकाळी विजयाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा मराठ्यांनी पहिला विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळाला लावला. त्यानंतर चिवटे यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला. अचानकपणे झालेल्या या आदरसत्काराने चिवटेही भारावून गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्या चर्चा

14 नोव्हेंबर 2023 रोजी अंतरवली सराटीत जरांगे यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांच्यासोबत कादंबरीकार विश्वास पाटील, छत्रपती संभाजीनगर शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळआदी उपस्थित होते. यावेळी मंगेश चिवटे आणि विश्वास पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

21 डिसेंबर 2023 रोजी सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल झाले होते. त्यानंतर हे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत गेलं. शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, संदिपान भुमरे आणि मंगेश चिवटे होते. नंतर मंत्री गिरीश महाजनही या शिष्टमंडळात दाखल झाले होते.

नंतर 16 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटीत गेलं. विशेष विमानाने हे शिष्टमंडळ आधी संभाजीनगर नंतर अंतरवलीत आलं. या शिष्टमंडळात बच्चू कडू, संदीपान भुमरे आणि मंगेश चिवटे होते. यावेळी मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबत फायनल ड्रफ्ट देण्यात आला.

18 जानेवारीलाही बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटलं.

26 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री यांचे ओएसडी मंगेश चिवटे उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक चालली. याच बैठकीत सग्यासोयऱ्याच्या संबंधातील अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.