Ajit Pawar : सारखं फुकट कशाला हवं? अजितदादांची शेतकऱ्यांना ‘कडू’ गोळी; कालच्या सरकारच्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता?

Ajit Pawar Big Statement : 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन काल सरकारनं दिलं आणि लागलीच अजितदादांनी शेतकऱ्यांना 'कडू' गोळी दिली. सारखं सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना फटकारले.

Ajit Pawar : सारखं फुकट कशाला हवं? अजितदादांची शेतकऱ्यांना कडू गोळी; कालच्या सरकारच्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता?
अजित पवार
| Updated on: Nov 01, 2025 | 10:03 AM

Ajit Pawar on Loan Waiver Scheme : कालच महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी तारीख निश्चित केली. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन काल सरकारनं दिलं आणि लागलीच अजितदादांनी शेतकऱ्यांना ‘कडू’ गोळी दिली. सारखं सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना फटकारले. त्यामुळे सरकारच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल केल्या जात आहे. कर्जमाफीवर अजितदादांच्या वक्तव्याने मोठं प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

तोडगा काढला की वेळ मारुन नेली

बच्चू कडू यांनी अचानक शेतकरी कर्जमाफीवरून नागपूरात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनात झाडून शेतकरी नेते हजर झाले. काही शेतकरी नेते आणि संघटना या आंदोलनापासून अनाकलनीयरित्या दूर राहिल्या. पण त्यांचा मोर्चा ऐन भरात असतानाच सरकारने त्यांना वाटाघाटीसाठी मुंबईत बोलावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कर्जमाफीवर तोडगा निघाला. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन देऊन सरकार मोकळं झालं. पण आता अजितदादांच्या वक्तव्याने तोडगा निघाला की सरकारने वेळ मारून नेली अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली.

निवडून येण्यासाठी तसं बोललो

अजितदादा हे रोखठोक बोलतात हे सर्वांनाच माहिती आहेत. “शुन्य टक्के व्याज दराने कर्ज दिल्यावर ते वेळच्या वेळी फेडायची सवय लावा ना. सारखं फुकटात, सारखं फुकटात, सारखं माफ, सारखं माफ, मग कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवार यांच्या काळात कर्ज माफ झालं. एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना कर्जमाफी झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं, आम्ही माफ करु आम्ही माफ करू, मग करा माफ. काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला.” अशा शब्दात अजितदादांनी शेतकऱ्यांना फटकारलं.

शेतकरी चून चून के बदला घेतील

शेतकरी सध्या संकटात असताना असं असंवेदनशीलपणे बोलूच नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली असं वक्तव्य अजितदादांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं वक्तव्य आहे. म्हणजे लोकांचे मतं मिळवण्यासाठी तुम्ही बेईमानी केली. खोटी आश्वासनं दिली. मत मिळवल्यावर आता शेतकऱ्यांशी बेईमानी करताय. या बेईमानीचा बदला शेतकरी चून चून के घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आता कर्जमाफी खरंच होणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.