त्या एका शब्दासाठी सोडली शरद पवारांची साथ, पण… दिलीप वळसे पाटील यांचा उलगडा, आता महायुतीलाचा इशारा

Dilip Walse Patil on Sharad Pawar: शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला दिलीप वळसे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. कोणत्या आश्वासनामुळे पवारांची साथ सोडली? काय केला उलगडा?

त्या एका शब्दासाठी सोडली शरद पवारांची साथ, पण... दिलीप वळसे पाटील यांचा उलगडा, आता महायुतीलाचा इशारा
दिलीप वळसे पाटील, शरद पवार, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 8:06 AM

सुनील थिगळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज अजितदादा हयात नसताना आणि दिलेला शब्द न पाळल्याची बोचणी मनाला लागल्यानंतर पाटील यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्या एका शब्दासाठी सोडली पवारांची साथ

“डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली,” असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे. डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती.

या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता महायुतीला निर्वाणीचा इशारा

सोशल मीडियावर वळसे पाटील यांनी याविषयीची भूमिका मांडली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची तालुक्यात आणि जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे. डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे, हा बोगदा चुकीच्या पद्धतीने झाल्यास भविष्यात शेतीसमोर गंभीर जलसंकट उभे ठाकेल असे ते म्हणाले. याविषयावर मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन एकदा चर्चा करणार आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो हे समोर आल्यानंतर भूमिका निश्चित करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us