उद्धव ठाकरेंची नसनस ओळखतो… शरद पवार, काँग्रेसला सोडणार का? रामदास कदम यांचा थेट सवाल

बाळासाहेबांचा ब्रँड टिकला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा नाही. ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे नाही. बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड टिकला पाहिजे ही मनापासून इच्छा आहे. बाळासाहेबानंतर राज ठाकरे ठाकरे ब्रँड होऊ शकतात, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले.

उद्धव ठाकरेंची नसनस ओळखतो... शरद पवार, काँग्रेसला सोडणार का? रामदास कदम यांचा थेट सवाल
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2025 | 1:00 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल. आता मी तुम्हाला बातमीच देईन, असं सूचक विधान करून उद्धव ठाकरे यांनी चर्चेचं मोहोळ उठवलं आहे. तर आज पहिल्यांदाच दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो छापून ठाकरे गटाने युतीच्या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं आहे. ही चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न केले आहेत. राज ठाकरे यांची भोंग्याची कडवट भूमिका स्वीकारणार आहात का? राजसोबत जाताना काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहात का? असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची मी नसनस ओळखतो, असा हल्लाही कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. राज ठाकरे म्हणजे आमचं घर आहे, असं ठाकरे गट म्हणतो. मग उद्धव ठाकरे तुम्हाला एक प्रश्न करतो. आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे असताना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. कौटुंबिक नातं जपलं होतं. राज ठाकरेंचा मुलगा उभा असताना तुम्ही त्याला पाडलं. तेव्हा तुमचं कौटुंबिक नातं कुठं गेलं होतं? असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे फसवा माणूस

उद्धव ठाकरे अतिशय फसवा माणूस आहे. उद्धव ठाकरेंची ओठात एक आणि पोटात एक ही भूमिका अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय. समजा उद्या युती झाली तर राज ठाकरेंचा अजेंडा यांना मान्य असेल का? राज ठाकरे मशीदवरील भोंग्यावरून आंदोलन करत आहेत, राज ठाकरेंची ही भूमिका मान्य होणार आहे का? ही कडवट भूमिका राज ठाकरेंची असताना तुम्ही एकत्र येणार का? आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात. कितीही चर्चा झाली तरी दोघे भाऊ एकत्र येतील यात आज तथ्य आहे असं वाटत नाही, असा दावाही रामदास कदम यांनी केला.

शरद पवारांना सोडणार का?

आता भावबंदकीची आठवण झाली. जेव्हा राज ठाकरेंना गरज होती तेव्हा भावबंदकी कुठे गेली होती? त्यांच्या मुलाला का पाडलं? तेव्हा कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं? राज ठाकरेंकडून ते जपलं गेलं. आता शरद पवार आणि काँग्रेसला सोडणार का? राज ठाकरेंना सोबत घेऊन बाळासाहेबांची हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणार का? असा सवाल करतानाच वाटतं तेवढं हे सोपं नाहीये, असंही कदम म्हणाले.

ठिगळ लावण्यासाठी राज यांचा वापर

उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आकाश फाटलं आहे. केवळ ठिगळ लावण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करून घेणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंची नसनस मी ओळखतो. दोन भाऊ एकत्र आल्यावर सर्वांना आनंद होईल. पण उद्धव ठाकरेंकडून जे काम चाललंय ते वैयक्तिक स्वार्थापोटी चाललंय. राज ठाकरेंबाबत आस्था, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, ओलावा आहे, असं काही नाही. मी उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यावरून सांगतो, असंही त्यांनी सांगितलं.