मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली, किरीट सोमय्यांचा बीएमसीवर हल्लाबोल

| Updated on: Oct 05, 2020 | 5:28 PM

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत उघड्या गटारीत पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या मुद्द्यावर बीएमसीला चांगलेच धारेवर धरले आहे (Kirit Somaiya allege Criminal Negligence of BMC in Manhole death).

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली, किरीट सोमय्यांचा बीएमसीवर हल्लाबोल
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत उघड्या गटारीत पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या मुद्द्यावर बीएमसीला चांगलेच धारेवर धरले आहे (Kirit Somaiya allege Criminal Negligence of BMC in Manhole death). तसेच मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच या महिलेची दोन लहान लेकरं आईला मुकली असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी गटाराचे निकृष्ट काम करुन भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “आमच्या विभागात राहणारी महिला शीतल दामा वार्ड क्र 160, शिवाजीनगर, असल्फा व्हिलेज, घाटकोपर या ठिकाणाहून 3 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 ते 7 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात गटारात पडून वाहून गेली. या गटारांवर पुर्वी सिमेंटचे ढापे बसवलेले होते. परंतु जानेवारी दरम्यान गटारांचे दुरुस्तीचे काम केल्यावर त्यावर निकृष्ट दर्जाचे ढापे बसवण्यात आले होते.”

“कालपासून अग्निशमन दल पोलीस महिलेचा शोध घेत होते. परंतु या महिलेचा मृतदेह आज (5 ऑक्टोबर) पहाटे 3 वाजता वरळीतील नाल्यात सापडला आहे. त्या महिलेला 2 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली आहेत,” असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. गटाराचे काम करणारा कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रहिवाशी करत आहेत. शीतल दामा असल्फा घाटकोपर महापालिकाच्या उघड्या गटारीत पडल्या होत्या. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह वरळीत सापडला. त्यामुळे आता या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच बीएमसीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

सरकारनं पोस्टमॉर्टन रिपोर्ट चुकीचा तयार केला, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी SRA मध्ये फ्लॅट-ऑफिस बळकावले : किरीट सोमय्या

Kirit Somaiya | कंगनाचं मुंबईसंबंधी स्टेटमेंट, अर्णबचं एकेरी बोलणं चुकीचं : किरीट सोमय्या

Kirit Somaiya allege Criminal Negligence of BMC in Manhole death