रेल्वेचा हलगर्जीपणा, मुंबईतल्या स्थानकात महिलांच्या शौचालयांना दरवाजे नाहीत!

रेल्वेचा हलगर्जीपणा, मुंबईतल्या स्थानकात महिलांच्या शौचालयांना दरवाजे नाहीत!

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकावर महिलांसाठी दरवाजा नसलेली शौचालयं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे महिलांसाठी जागोजागी शौचालयं व्हावीत, यासाठी महिला संघटना आवाज उठवत असताना, बोरीवली रेल्वे स्थानकावर मात्र महिलांसाठी दरवाजा नसलेली शौचालयं उभारण्यात आली असल्याचं समोर आलं. एका स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या संयुक्ता सिंह यांनी हा प्रकार समोर आणला. संयुक्ता सिंह जेव्हा […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकावर महिलांसाठी दरवाजा नसलेली शौचालयं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे महिलांसाठी जागोजागी शौचालयं व्हावीत, यासाठी महिला संघटना आवाज उठवत असताना, बोरीवली रेल्वे स्थानकावर मात्र महिलांसाठी दरवाजा नसलेली शौचालयं उभारण्यात आली असल्याचं समोर आलं. एका स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या संयुक्ता सिंह यांनी हा प्रकार समोर आणला.

संयुक्ता सिंह जेव्हा बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर असणाऱ्या महिला शौचालयात गेल्या, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेथील शौचालयात प्रचंड दुर्गंधी तर होतीच, पण भारतीय पद्धतीच्या या शौचालयात ना दरवाजे होते, ना पाणी.

‘हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. तेथील रेल्वे स्टाफच्या निदर्शनास ही बाब मी आणून दिली. पण त्यांनी आपण काहीच करु शकत नसल्याचं सांगितलं’, अशी माहिती संयुक्ता यांनी दिली.

‘माझी स्वयंसेवी संस्था ‘We Can, We Will’ च्या काही सहकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. मात्र त्यांनीही हात वर करत यामध्ये आपण काहीच मदत करु शकत नसल्याचं सांगितलं. यानंतर मी फोटो ट्वीट करत ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली’, असेही संयुक्ता यांनी सांगितलं.

ट्वीटमध्ये संयुक्ता यांनी संताप व्यक्त करत या शौचालयांमध्ये माणसांनी जावं अशी अपेक्षा तुम्ही करता, असा सवाल केला. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने, या गोष्टीचा तपास करु आणि जर कंत्राटदाराने अपूर्ण काम केलं असेल तर त्या विरोधात कारवाई करु अशी माहिती दिली. दररोज बोरीवली स्थानकावरुन लाखो लोक प्रवास करतात. या स्थानकावर 10 प्लॅटफॉर्म आहेत मात्र शौचालय एकचं आणि ते ही वापरण्यासारखं नाही.

संयुक्ता यांच्या ट्वीटला रेल्वेने उत्तर देत माफी मागितली आणि संबंधित अधिकाऱ्याला स्वच्छतेची तसेच अपूर्ण कामाची दखल घेण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें