
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर पक्षांतरावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे. आज अनेक वर्ष निवडणुका रखडल्या, का रखडल्या? याची कारणं कुणालाही देता येणार नाही, सांगता येणार नाही, कारणं कळलीच नाही. इतकी वर्ष निवडणुकीला का लागले? कशासाठी लागले? चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यावरही निवडणुका होत नव्हत्या. का होत नव्हत्या याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे. कोण कुठं चाललंय कोण काय चाललंय मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही. प्रत्येकाला विचारावं लागतं आज कुठे? काही जण वेडेपिसे झाले, त्या दिवशी कळलं एकाने छाननीच्या वेळी समोरच्याचा एबीफॉर्म घेतला आणि गिळला, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, वेळ नव्हता, दिवस नव्हता, एखादा दिवस असता तर सकाळी तरी एबी फॉर्म बाहेर पडला असता. तीही वेळ दिली नाही. कोणत्या थराला गेल्या आहेत निवडणुका? बिनविरोध निवडून येतात, तिकडच्या लोकांना मतदानाचा अधिकारही त्यांना देणार नाही का? काहीवेळा दहशतीतून, काही वेळा पैसे देऊन, आकडे ऐकतोय कुणाला एक कोटी, कुणाला पाच कोटी, कल्याण डोंबिवलीत प्रभागात एका घरातील तिघे उभे आहेत, त्यांना काय ऑफर झाली असेल? एका प्रभागातील तिन जणांना १५ कोटी रुपयांची ऑफर झाली. कुणाला पाच कोटी, कुणाला दोन कोटी, येतात कुठून एवढे पैसे? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
भीती घालायची, दहशत करायची आणि अशा वातावरणात निवडणुका घेता. नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना? म्हणजे ५२ साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने त्याला २०२६ ला पोरं भाड्याने घ्यावे लागतात. तुमची माणसं उभी केली होती ना? मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.