
महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकल गेलं असून 29 महापालिकांसाठी 15 जानेवारील मतदान तर 16 ला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तर अतिशय चुरशीची ठरताना दिसत आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर असा नारा सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. तर 20 वर्षांनी एकत्र आलेल्या राज (Raj Thackrey) व उद्धव (Uddhav Thackrey) या ठाकरे बधूंनी ‘मुंबई वाचवा’, मुंबईत मराठीच महापौर होईल असं म्हणत एल्गार पुकारला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली. त्याचा दुसरा भाग समोर आला असून ‘‘आता मराठी म्हणून सगळय़ांनी एकत्र यावेच लागेल. आपापसातले मतभेद, भांडणं मिटवा. महाराष्ट्रापुढे काहीही नाही’’ असे आवाहन ठाकरे बंधूंनी राज्यातील जनतेला केलं आहे.
दरम्यान याच मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं विधानही केलं आहे. मुंबईची संस्कृती मारली जात असून ते चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, फडणवीसांच्या गर्जनेवर विश्वास आहे का ?
मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल हे आपण सातत्याने म्हणतो, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यावर राज आणि उद्धव या दोघांनीही सविस्तर उत्तर दिलं.
फडणवीसांची इच्छा चांगली असली तरी मुळात त्यांच्या हातात काहीच नाही, असं मनसे् अध्यक्ष राज ठाकरे म्हणावे. कारण त्यांना ‘वरून’, म्हणजे दिल्लीतून जे सांगितलं जातं तेच त्यांना ऐकांव लागतं. त्यामुळं वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले. Obey the Order एवढीच गोष्ट फक्त फडणवीसांच्या हातात आहे. वरती बसलेले दोघेजण (मोदी-शहा) जे आहेत, त्यांनी सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर (फडणवीस) सही करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांची कितीही इच्छा असली तर वरच्यांच्या मनात काय चाललंयच ते जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि त्यांच्या मनात काय ते स्पष्ट कळतंय अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मोदी-शहांवर टीका केली.
मुंबईची संस्कृती मारली जाते
त्याच प्रश्नाला उत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजकाल कोणीही येतो आणि म्हणतो की या भागाची भाषा ही गुजराती आहे. (ते) आमच्यावर हिंदीची सक्ती करतील, म्हणजे आपली सगळी अस्मिता मारायची , संस्कृति मारायची आणि मग काय ? केवळ नावापुरती मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, याला काही अर्थचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. बस म्हटलं की बस आणि ऊठ म्हटलं की ऊठ मानणारी ही लोकं आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे, ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.