कोरोना चाचणीसाठी घाई, पण अहवाल दिला 20 दिवसांनी; नागपूरमध्ये चाललंय काय?

नागपूरच्या कन्हान तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. (nagpur people get covid report after 20 days later)

कोरोना चाचणीसाठी घाई, पण अहवाल दिला 20 दिवसांनी; नागपूरमध्ये चाललंय काय?
Covid Test
भीमराव गवळी

|

Apr 28, 2021 | 5:33 PM

नागपूर: नागपूरच्या कन्हान तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी घाई करणाऱ्या आरोग्य केंद्राने चार-पाच नव्हे तर तब्बल 20 दिवसानंतर गावकऱ्यांना कोरोना चाचणीचा अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे पालक मंत्री नितीन राऊत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला आहे. या घटनेमुळे आरोग्य केंद्राच्या कारभारावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. (nagpur people get covid report after 20 days later)

8 एप्रिलला कन्हान येथील कान्द्री प्राथमिक आरोग्य केंद्रात 92 लोकांनी कोविड टेस्ट केली. यापैकी 81 लोकांचे अहवाल संबंधितांना कळविण्यात आले. मात्र उर्वरित 11 लोकांना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे काहीही कळविण्यात आले नाही. कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम नितनवरे आणि त्यांच्या पत्नी यांचीही टेस्ट करण्यात आली होती. चाचणी अहवाल न मिळालेल्या 11 लोकांमध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे ते व अन्य काही लोक सतत आरोग्य केंद्रावर जाऊन डॉ. योगेश चौधरी, डॉ. डुडमवार व त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या अहवालाचे काय झाले याची विचारणा करीत होते. मात्र त्यांना काहीही माहिती दिली जात नव्हती.

राऊतांनी फैलावर घेतले, चक्रे फिरली

कोविड अहवालाबाबत कुणाकडूनही काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी अखेर पालकमंत्री डॉ. निती राऊत यांच्याकडे दाद मागितली. या तक्रारीनंतर राऊत यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना फैलावर घेतलं. चाचणी होऊन 20 दिवस झाल्यावरही अहवाल दिले जात नाहीत ही गंभीर बाब आहे असे सांगत राऊत यांनी संबंधितांना फैलावर घेतले. जिल्ह्याचे मुख्य शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर यांना या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश राऊत यांनी दिले. त्यानंतर प्रशासनातील चक्रे फिरली आणि सबंधितांना आज अहवाल कळविण्यात आले.

बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा

चाचणी अहवाल प्राप्त न झाल्याने संक्रमित व्यक्ती आजूबाजूला बिनधास्त फिरत होते. या काळात त्यांनी कुटुंबातील व परिसरातील किती लोकांना कोरोना संक्रमित केले असेल याची तुम्हीच कल्पना करू शकता. आम्ही निगेटिव्ह होतो तर ही माहिती आम्हाला द्यायला आरोग्य प्रशासनाला 20 दिवस का लागले? आम्ही पती-पत्नीने खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला विलगिकरणात ठेवले, 14 दिवस आमचे कामही ठप्प होते. अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गौतम नितनवरे यांनी केली.

एखादा व्यक्ती दगावला असता तर

गेले 20 दिवस आम्ही सर्वानी तणावात काढले. चाचणी अहवालच आले नाही तर औषध उपचार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झालेला होता. ज्या- ज्या डॉक्टर्सने दाखवले त्यांनी रिपोर्ट आल्यावर पुढचे औषधे देऊ असे सांगितले. जर एखाद्या रुग्णाची स्थिती गंभीर होऊन तो दगावला असता तर या निष्काळजीपणासाठी सरकारी यंत्रणाच दोषी ठरली असती, अशी संतप्त भावनाही नितनवरे यांनी व्यक्त केली.

अखेर माहिती दिली

कांद्री येथील मतिमंद शाळेतील चाचणी केंद्रात 8 एप्रिल रोजी 102 लोकांनी चाचण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 लोक प्रत्यक्ष चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. त्यामुळे 92 लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी 7 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. 85 लोकांचे नमूने आरटीपीसीआर चाचणीसाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी 81 लोकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट प्राप्त झाले. गौतम व सुषमा नितनवरे यांची चाचणी अँटिजेन निगेटीव्ह आली. निधी प्रसाद ही 11 वर्षीय मुलगी आणि 35 वर्षीय नितीन वैद्य यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतीही लक्षणे नव्हती,असे या चाचणी केंद्राच्या प्रमुखांनी राऊत यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. (nagpur people get covid report after 20 days later)

संबंधित बातम्या:

‘गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’, एकनाथ खडसेंची वादग्रस्त ऑडिओ क्लीप व्हायरल

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

Maharashtra lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल- राजेश टोपे

(nagpur people get covid report after 20 days later)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें