ज्योती मल्होत्रानंतर महाराष्ट्रातली सुनिता रडारवर, एका चुकीमुळं…NIA, ATS चौकशी करणार!
सुनिता जामगडे ही महिला एलओसी पार करून पाकिस्तानात गेली होती. तिला आता नागपुरात परत आणण्यात आलंय.

Sunita Jamgade : गेल्या काही दिवसांपासून देशात ज्योती मल्होत्रा हे प्रकरण चर्चेत आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. देशातल्या वेगवेगळ्या तपास संस्थांकडून तिची चौकशी केली जात आहे. असे असतानाच आता महाराष्ट्रातील सुनिता जामगडे या महिलेचीही चर्चा होत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचलेला असताना नागपूरातील सुनीता जामगडे बेकायदेशीरपणे एलओसी पार करुन पाकीस्तानात गेली होती. हीच सुनिता देशाच्या तपास संस्थांच्या रडारवर आली आहे. तिने केलेल्या एका चुकीमुळे तपास संस्थांचा तिच्यावर संशय बळावला आहे.
काल (28 मे) रात्री सुनीलाता नागपुरात आणण्यात आलंय. ती बेकायदेशीरपणे सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. तिच्या या कृतीनंतर ती तपास सस्थांच्या नजरेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनीता जामगडेची आता राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे.
सुनीताने केली एक चूक
मिळालेल्या माहितीनुसार तिला पाकिस्तानातून परत भारतात पाठवण्यात आले. सध्या तिला नागपुरात आणण्यात आले आहे. पण ही सर्व प्रक्रिया घडत असताना सुनीताने तिच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलिट केल्याचे समोर आले आहे. याच एका चुकीमुळे तिच्यावर पोलिसांना संशय आला आहे. आता नागपूर सायबर पोलिसांची तज्ज्ञ टीम सुनीताच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगील येथे गेली
तिने नागपूरातील काही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली का? याचा तपासही पोलीस करत आहेत. तशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिलीय. प्राथमिक चौकशीत मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगील येथे गेले, पैसे संपल्यावर तिथे नोकरी शोधली आणि पाकिस्तान गेली, अशी उडवाउडवीची उत्तरं ती देत असल्याचं पोलीस सांगत आहेत.
संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबत माहिती दिली का?
कारगील पोलीसांनी दिलेली माहिती तसेच तिचा मोबाईल डाटा तपासून सुनीता जामगडे हिच्या जबाबाची तपासणी केली जाणार आहे. सुनीता जामगडे हिने हेरगीरी केली का? नागपूरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबत संवेदनशील माहिती दिली का? याचा तपासही विविध तपास यंत्रणा करणार आहेत. तिच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील चौकशी सुरु आहे.
नेमके कोणकोणते प्रश्न उपस्थित झाले?
सुनीता सध्या भारतात परतली असली तरी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुनीता जामगेडे या महिलेने मोबाईल नेमका कशासाठी format केला? BSF ची सुरक्षा असताना सुनीताने LOC पार कशी केली? असे प्रश्न उपस्थित झाले असून आता या प्रश्नांची उत्तरं शोधली जाणार आहेत.
