राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच पदाचा मान ठेवला नाही, बच्चू कडू बरसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. | Bacchu Kadu

राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच पदाचा मान ठेवला नाही, बच्चू कडू बरसले
बच्चू कडू

नागपूर: राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Bacchu kadu slams Governor Bhagat Singh Koshyari)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली. तसेच विनाअनुदानित शाळांची ग्रँट वाढवण्याचा निर्णयही यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केला. ज्या शाळांना सध्या 0 ते 20 टक्के इतकी ग्रँट मिळत आहे त्यांची ग्रँट लवकरच 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

त्यासोबतच राज्यात अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या सीबीएसई शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यासाठी राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. आतापर्यंत नागपूरात पाच शाळांवर अशाचप्रकारे कारवाई करण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor vs Thackeray Sarkar) यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. त्यानंतर राज्यपाल खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले.

नियमांचं पालन करणं अहंकार आहे का, राज्यपालांनी अधुनमधून गोवा सरकारचं विमानही वापरावं: राऊत

संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात.
मात्र, व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

(Bacchu kadu slams Governor Bhagat Singh Koshyari)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI