Nagpur News : धान रोवणीसाठी चिखल करत असताना दुर्घटना, ट्रॅक्टर अंगावर पलटल्याने चालकाचा मृत्यू

सध्या पावसाळी शेतीची कामे सुरु आहेत. यावेळी रोवणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु असतानाच ट्रॅक्टर चिखलात रुतला अन् पुढे अनर्थ घडला.

Nagpur News : धान रोवणीसाठी चिखल करत असताना दुर्घटना, ट्रॅक्टर अंगावर पलटल्याने चालकाचा मृत्यू
नागपुरमध्ये ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 28, 2023 | 4:10 PM

नागपूर / 28 जुलै 2023 : शेतात धान रोवणीसाठी चिखल करत असताना घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात चिखल करत असताना ट्रॅक्टर चिखलात रुतला. ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना उलटला. यावेळी ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. विलास देशकर असे मृतकाचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा शिवारात ही घटना घडली. मौदा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

चिखलात रुतलेला ट्रॅक्टर बाहेर काढताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, इसापूर शिवारातील माणिक समृत या शेतकऱ्याने करार पद्धतीने शेत घेतले होते. त्यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू असल्याने ट्रॅक्टरने चिखल तयार करण्याचे काम शेतात सुरू होते. यावेळी ट्रॅक्टर चिखलात अडकला होता. यामुळे चाकात चेंडू टाकून ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने चालक विलास ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच मौदा पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलास याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.