सेल्फी काढताना दादा पाण्यात पडला, धाकट्याचीही धरणात उडी, दोन सख्खे भाऊ बुडाले

मंगेश मधुकर जुनघरे (37 वर्ष) आणि विनोद मधुकर जुनघरे (35 वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. दोघेही नागपूर जिल्हातील उमरेड येथील रहिवासी होते.

सेल्फी काढताना दादा पाण्यात पडला, धाकट्याचीही धरणात उडी, दोन सख्खे भाऊ बुडाले
नागपुरात सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : सेल्फी काढण्याच्या नादात गोसेखुर्द धरणाच्या कॅनालमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर फिरायला आलेल्या नागपूरच्या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.

पाच मित्र धरणावर फिरायला

मंगेश मधुकर जुनघरे (37 वर्ष) आणि विनोद मधुकर जुनघरे (35 वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. दोघेही नागपूर जिल्हातील उमरेड येथील रहिवासी होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच मित्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण क्षेत्रात फिरायला आले होते.

नेमकं काय घडलं?

गोसेखुर्द धरणावर मंगेश जुनघरे सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा धाकटा भाऊ विनोद जुनघरे यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

स्थानिक मच्छिमारांना बोलावून शोधकार्य सुरू केले, मात्र अजूनपर्यंत त्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. पोलिसांचे शोधकार्य सुरु आहे. एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं उमरेडमध्ये शोककळा पसरली आहे.

चिखलदऱ्यातील जत्रा डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू

दुसरीकडे, अमरावती जिल्हातल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटक युवकांचा डोहात बुडून मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रविवारी दुपारी ही घटना घडली. दोघांचे मृतदेह पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने डोहाबाहेर काढले. दोघेही आपल्या एकूण 9 मित्रांसह अकोला येथून 15 ऑगस्ट निमित्त चिखलदरा येथे फिरायला गेले होते. त्याच दरम्यान जत्रा डोहात बुडून 26 वर्षीय शेख इकरम शेख हुसेन कुरेशी आणि 27 वर्षीय शेख आजीम शेख सकुर यांचा मृत्यू झाला.

नऊ मित्र चारचाकी वाहनाने चिखलदरा येथे आले होते. चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविध पॉइन्ट्सना भेट दिल्यानंतर, सर्व मित्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत असलेल्या जत्राडोह पॉईंट पाहण्यासाठी गेले. येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात उतरण्यास सक्त मनाई असतानाही पर्यटक उतरतात. रविवारी सुद्धा हे मित्र एकमेकांच्या अंगावर पाणी फेकत असताना काही जण खोल पाण्यात उतले. यादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू झाला असून हे दोघेही अकोला शहरातल्या अकोट फाईल भागात राहणारे होते.

संबंधित बातम्या :

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मनाई असताना धरणात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या बाळाला कुमारी मातेनेच विहिरीत फेकलं, पाण्यात बुडून मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI