
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला. त्यात 26 पर्यटक मारल्या गेले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. त्यामुळे भारत मोठी कारवाई करणार हे निश्चित होते. भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून तिथले दहशतवादी अड्डे नष्ट केले. या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले केले. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाकने गयावया केल्यानंतर दोन्ही देशात युद्ध विरामावर सहमती झाली. पण अजून ही कारवाई थांबलेली नसल्याचे समोर येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून ऑपरेशन सिंदूरविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे.
युद्धविराम हा केवळ पत्रकारितेतील शब्द
भारत आणि पाकिस्तानमध्ये कारवाईच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी युद्ध विरामावर शिक्कामोर्तब झाले. त्यावर अनेक जणांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची नामी संधी गमावल्याचे काहींनी मत मांडले. अर्थात कुटनीती वेगळी असते आणि त्यानुरूपच धोरण स्वीकारावे लागते. या प्रश्नावर संघ गोटातून खास प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानला पुन्हा अद्दल घडवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “भारत पाकिस्तान युद्ध थांबलं नाही, युद्धविराम हे केवळ पत्रकारितेतले शब्द आहे”, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे भारत हा पाक कधी आगळीक करतो आणि त्याला कायमचा धडा कसा शिकवता येईल याची तयारी करत असल्याचे समोर येत आहे.
देवधर यांनी “ॲापरेशन सिंदूर’ थांबलं नाही, पुढेही सुरु राहणार. भारत – पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धविराम नाही, स्वल्पविराम आहे. कारवाई सुरु राहणार” असे मोठे वक्तव्य करत पुढची दिशा कशी असेल यावर प्रकाशझोत टाकला.
पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार
दिलीप देवधर यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार असल्याचे ही म्हटले आहे. आधी सर्जीकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक आणि आता ॲापरेशन शिंदूर हे एकाच ॲापरेशनचाच भाग असल्याचे ते म्हणाले. म्हणजे एका निश्चित धोरणासह पाकिस्तानविरोधात व्युहरचना करण्यात येत आहे. संधी मिळताच पाकव्याप्त काश्मीरचे स्वप्न सुद्धा पूर्ण होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर पुन्हा ॲापरेशन करण्याचे संघ वर्तुळातून संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात १०१ प्लॅन आहेत, आतंकवाद्यांना उत्तर कशी द्यायची याचा आधीच प्लॅन ठरला होता, असे देवधर म्हणाले. पुढे काय काय होणार? हे बघायला मिळेलच. येत्या काळात बलुचिस्तान मुक्तीचा लढा समोर येईल याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. युद्धविरामामुळे संघ वर्तुळात नाराजी नाही, ISI चे भारतातील एजंट ही अफवा पसरवत आहेत. संघ परिवार, मोदी आणि भागवत एकच आहे. नाराजी, राजी आली कुठून, असे महत्त्वाचे विधान देवधर यांनी केले.