Nagpur NMC | 500 चौ. फुटापर्यंत मालमत्ता करमाफी झाल्यास कोण उचलेल वाटा?; स्थायी समिती सभापती म्हणतात, राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी

500 चौ. फुटाची मालमत्ता असल्यास करमाफी द्यावी, अशी मागणी मनपाचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी राज्य सरकारकडं केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पारीत करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

Nagpur NMC | 500 चौ. फुटापर्यंत मालमत्ता करमाफी झाल्यास कोण उचलेल वाटा?; स्थायी समिती सभापती म्हणतात, राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी
प्रकाश भोयर, स्थायी समिती सभापती, मनपा, नागपूर

नागपूर : राज्य सरकारने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौ. फूट (46.46 चौरस मीटर) अंतर्गत रहिवासी मालमत्तेचा मालमत्ता कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नागपूर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या 500 वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करून मनपाला होणारी नुकसानभरपाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केली. मालमत्ता कर व कर आकारणी वसुलीबाबत स्थायी समिती सभापती कक्षात मालमत्ता विभागाची बैठक पार पडली.

नुकसान राज्य सरकारने द्यावे

मुंबई महापालिकेप्रमाणेच नागपूर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या 500 वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असा ठराव मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीत एकमताने पारीत करण्यात आला. राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरिबांच्या दृष्टीने हिताचा आहे. मात्र, यामुळं मनपाचे एका आर्थिक वर्षात सुमारे 35 कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे होणारी नुकसान भरपाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी सभापती प्रकाश भोयर यांनी केली.

मालमत्ता कर वसुलीचे 332 कोटी

स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, जर राज्य शासनाने या मागणीवर शिक्कामोर्तब केले तर 500 वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्ता धारकांना थकीत मालमत्ता कर भरल्यानंतरच ही माफी दिली जाईल. त्यामुळं सर्व थकीत मालमत्ता धारकांनी आपला कर लवकरात लवकर भरावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी स्थायी समिती सभापतींनी मालमत्ता कर वसुली बाबत आढावा घेतला. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीचे 332 कोटी एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी 5 जानेवारी 2022 पर्यंत 150 कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. 500 वर्ग फुटापर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाने मनपाचे एकूण 35 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालमत्ता कर भरा, कारवाई टाळा

थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत शहरात 7 हजार 130 थकीत मालमत्ता कर धारकांवर वॉरंटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे घर व खुले भूखंड जप्त करण्यात आले आहेत. यापैकी 360 स्थावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 58 मालमत्तांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून 21 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळं कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ता कर धारकांनी आपले नियमित आणि थकीत कर लवकरात-लवकर भरुन आपली पाटी कोरी करावी, असे आवाहन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केले आहे.

Nagpur Surya | नागपुरातील सूर्याचा अस्त; आता बाँब शोधणार कोण? पोलीस दलाला चिंता

Nagpur | कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर कसा देणार?, मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितला प्लान

 

Published On - 6:01 am, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI