नाणार प्रकल्प रायगडमध्ये हलवणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर

राज्यातील बहुचर्चीत नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar refinery project) आता रत्नागिरीतून रायगडला हलवण्यात येणार आहे.

नाणार प्रकल्प रायगडमध्ये हलवणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर

मुंबई : राज्यातील बहुचर्चीत नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar refinery project) आता रत्नागिरीतून रायगडला हलवण्यात येणार आहे. नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याबाबत स्थानिकांचा विरोध नाही, असं लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध नाही. अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन येथील 40 गावं प्रकल्पाच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. स्थानिकांच्या आणि राजकीय विरोधामुळे नाणार येथून तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला हलवल्याचं मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर म्हटलं आहे.

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता.  मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला होता. भाजपसोबत युती करताना शिवसेनेने नाणार रद्द करण्याची अट ठेवली होती. ही अट भाजपकडून मान्य करण्यात आली. 2 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या अखेरच्या फाईलवर सही केली होती.

मुख्यमंत्र्यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आता रायगडला हलवण्यात येणार आहे. नाणारचा हा रिफायनरी प्रकल्प रायगडमधील रोहा परिसरात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी तब्बल 50 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्यास बाजूला ठेवत, सिडकोअंतर्गत रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यांतील 40 गावांतील जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सरकारने ताब्यात घेतली.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

संबंधित बातम्या 

नाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही   

एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *