सुषमा अंधारे अडचणीत, पुरावे द्या..अन्यथा, अमन परदेशी यांनी काढली नोटीस
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर अडचणीत आल्या आहेत. या भाषणात अमन परदेशी यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्यांना नोटीस बजावली आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्या...अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार रहा, असे त्यांनी म्हटले आहे.

मनोहर शेवाळे, मालेगाव, नाशिक | 30 ऑक्टोंबर 2023 : पुणे आणि नाशिकमधील ललित पाटील यांचे ड्रग्स प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप रोजच सुरु आहे. आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ललित पाटील याचे एनकाऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. सुषमा अंधारे यांनी नाशिकमधील ड्रग्स प्रकरणात अमन परदेशी यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर अमन परदेशी आक्रमक झाले आहे. त्यांनी सुषमा अंधारे यांना नोटीस काढली आहे. सुषमा अंधारे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. अन्यथा कायदेशीर कारवाईस तयार रहावे, असे म्हटले आहे.
काय केले होते सुषमा अंधारे यांनी आरोप
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबई झाला होता. शिवतीर्थावर झालेल्या या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात ललित पाटील याच्या ड्रग्स प्रकरणाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या होत्या की, नाशिकच्या अमन परदेशी नावाच्या व्यक्तीने ड्रग्स प्रकरणी मंत्र्यांकडून फोन करून मांडवली करण्याचा प्रयत्न केला. या आरोपानंतर अमन परदेशी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावले.
सुषमा अंधारे यांना पाठवली नोटीस
अमन परदेशी यांनी आता सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवली आहे. माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहा, अशी नोटीस सुषमा अंधारे यांना पाठवली आहे. आरोपांचे पुरावे न दिल्यास सुषमा आंधारे यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे अमन परदेशी यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपात तथ्य नाही. मला बदनाम करुन माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न त्यांचा असल्याचा आरोप परदेशी यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज मिळाले. नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होते का? अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.
