फेसबुकवर प्रेम, भारतात लिव्ह इन, बांगलादेशात धर्मांतर, अजब प्रेमाचा गजब कांड समोर; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये एक बांगलादेशी तरुणीला बेकायदेशीर लग्न आणि मतदानाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २०१७ मध्ये एका नाशिकच्या तरुणाशी तिची ओळख झाली आणि त्यानंतर तिने भारतात प्रवेश केला.

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील तरुणाने धर्मांतर करुन एका २९ वर्षीय बांगलादेशी तरुणीशी मुस्लिम पद्धतीने लग्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिने नाशिकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानही केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये नाशिकच्या एका मुलाची फेसबुकवर या बांगलादेशी तरुणीसोबत ओळख झाली. त्यांची मैत्री वाढली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ही तरुणी बांगलादेशातून लपून-छपून भारतात येऊ लागली. सुरुवातीला ते दोघे काही महिने मुंबईत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहिले.
तब्बल १० वेळा विमानाने बांग्लादेशात
यानंतर ती बेकायदेशीरपणे कोलकाता मार्गे बांग्लादेशात परत गेली. तिथे तिला गर्भधारणा झाल्याचे समजले. तिने एका मुलीला जन्म दिला. ही बातमी मिळाल्यावर तो युवक तिला भेटण्यासाठी तब्बल १० वेळा विमानाने बांग्लादेशात गेला. तिच्यासाठी त्याने धर्मांतर करून मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. त्यावेळी त्यांची मुलगी चार वर्षांची होती.
तीन वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्य
गेल्या तीन वर्षांपासून ही बांगलादेशी तरुणी आपल्या मुलीसोबत नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात त्या युवकासोबत राहत होती. तिची मुलगी नाशिकमधील एका शाळेत शिकत असल्याची माहितीही समोर आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला फसवणूक केल्याप्रकरणी, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी आणि ती परदेशी नागरिक असल्याने अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
