सरोज म्हणाली नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, पण इथे किती नारळ आहेत बघा, अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे कान टोचले

| Updated on: Jul 01, 2021 | 9:34 AM

सरोज अहिरे यांच्या कामाचा उत्साह मी पाहतो आहे. पत्रकारांना विनंती आहे, आमदार सरोज अहिरे यांचा उल्लेख यापुढे विकास कन्या म्हणून करा." असंही अजित पवार म्हणाले.

सरोज म्हणाली नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, पण इथे किती नारळ आहेत बघा, अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे कान टोचले
Saroj Ahire, Ajit Pawar
Follow us on

नाशिक : “साधेपणाने कार्यक्रम कर, असं मी सरोज आहेर यांना सांगितलं होतं. नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, असं सरोज म्हणाली. पण इथे किती नारळ आहेत बघा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे कान टोचले. अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात रस्ते निर्मितीच्या कामांचं भूमिपूजन केलं. (Ajit Pawar pinches Nashik NCP MLA Saroj Ahire)

“आम्हीच नियम बनवायचे, मग पाळलेही पाहिजेत”

नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघात 51 कोटी रुपयांच्या रस्ते निर्मिती कामांचं भूमिपूजन करुन अजित पवार यांनी कुदळ मारली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. “आम्हीच नियम बनवायचे, मग आम्ही नियम पाळले पाहिजेत. न्यायालयाने मध्यंतरी विचारलं की राज्यात मोर्चे कसे काय निघात आहेत. मागच्या वेळेस सिंहस्थ झाला आणि कोरोना वाढला.” याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.

“सरोज अहिरेंचा उल्लेख विकास कन्या करा”

“कोरोना काळात डॉक्टर, नर्स जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आमदार सरोज अहिरे यांचे पती देखील डॉक्टर आहेत. त्यांना देखील डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा. सरोज अहिरे यांच्या कामाचा उत्साह मी पाहतो आहे. पत्रकारांना विनंती आहे, आमदार सरोज अहिरे यांचा उल्लेख यापुढे विकास कन्या म्हणून करा.” असंही अजित पवार म्हणाले.

“गावच्या सरपंचालाच सिक्युरिटीने अडवलं. ज्याला मान सन्मान दिला पाहिजे, त्यांची काही वेळेस अडचण होते. ज्याला येता आलं नाही त्यांची माफी मागतो.” असं म्हणत कार्यक्रमाला उपस्थित राहता न आलेल्यांची अजितदादांनी माफी मागितली.

“केंद्राचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष”

“पवार साहेब 50 वर्षांपासून जनतेत आहेत. आज आपण कृषी दिन साजरा करतो आहोत. पण केंद्राविरोधात 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बिल विधिमंडळात आम्ही आणणार आहोत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची देखील तरतूद आहे.” असं अजित पवारांनी सांगितलं.

“अनिल, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल”

“मी 5 कोटी क्रीडा संकुलासाठी जाहीर करतो. अनिल, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल पण इथे जास्त लक्ष दे” असा सल्ला
अजितदादांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला दिला. “मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी माझ्या मतदारसंघात मी 6 वाजता कामावर असतो. सगळे अधिकारी मला टरकून असतात” असं अजितदादा मिश्किलपणे म्हणाले.

दोन लसींसाठी प्रयत्न

“आपल्या राज्यातील सर्व व्यक्तींना दोन लसी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हाफकिनमध्ये व्हॅक्सिन तयार करण्याचा अधिवेशनात प्रस्ताव देणार आहे. जिल्ह्याने 7 आमदार दिले. पुढे त्यात आणखी वाढ करायची आहे. पश्चिमकडे पडणारे काम इकडे वळवून आणण्याचं काम भुजबळांनी केलं आहे. सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण

(Ajit Pawar pinches Nashik NCP MLA Saroj Ahire)