ओबीसी तितुका मेळवावा…
भुजबळ म्हणाले की, माझ्या राजकीय जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. ओबीसी प्रश्न आला की तुमचा-आमचा आवाज एक असला पाहिजे. ओबीसी समाजातील जाती आणि पोटजातींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यातील 54 टक्के समाज एकत्र आला तर राज्याचे आणि देशाचे चित्र वेगळे असेल. धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आपण मंत्रिमंडळात मांडून ती सोडविली जाईल. समाजात फूट न पाडता एकत्रित येऊया, असे त्यांनी सांगितले. तसेच चांदवडच्या रंगमहालाचे काम पर्यटन मंत्री असताना सुरू केले आहे, लवकरच या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम मार्गी लावले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मल्हाररावांना वडिलकीचा मान…
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणारे नाव सुभेदार मल्हारराव होळकर याचे होते. अवघ्या 20 वर्षांतच मल्हाररावांनी 74 लाखांचा मुलुख ताब्यात घेतला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार करून मराठी साम्राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात लहान मोठ्या एकंदर 52 लढायांत सहभाग घेतला. ते फक्त युद्ध कलेत निष्णात नव्हते, तर राजकारण व राज्यकारभारातही चाणाक्ष होते. पेशव्यांच्या दरबारात त्यांना वडिलकीचा मान होता.
मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवल्या…
भुजबळ म्हणाले की, रत्नपारखी नजर असलेल्या मल्हाररावांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह चौंडीचे माणकोजी पाटील यांची कन्या अहिल्याबाई यांचेशी केला. कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. आता तू माझी सून नसून माझा मुलगा खंडूच आहे, असे म्हणून राज्याची सर्व धुरा अहिल्यादेवींकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने ऊभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढविण्याच्या कामी त्यांच्या अर्धशतकाची कारकीर्द सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी आहे. मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन मराठा साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढविल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या तिजोरीवर ताण
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून, ओबीसी समाजाच्या प्रश्नांची सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. ते पुढे म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. मात्र, येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सोलापुरात अहिल्याबाईंचे स्मारक
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडविण्यात येतील. खा. शरद पवार यांच्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे समाजाला अधिक फायदा मिळाला. चांदवड रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून दिला जाईल. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमात हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर या पुरस्काराने विभागीय सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे, तुकाराम महाराज जेऊरकर, साहित्यिक तथा उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी, उपजिल्हाधिकारी रोहन कुंवर, नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र दुकळे, नगरसेविका पूनम मोगरे, प्रगतीशील शेतकरी दत्तू देवकर, उद्योजक बाळासाहेब मुरडनर, जनरल सर्जन डॉ. विजय थोरात, पत्रकार धनंजय वानले, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय गाढे यांचा सन्मान करण्यात आला.
इतर बातम्याः