नाशिकः गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेले नाशिक (Nashik) येथे होणारे 14 वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अखेर दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे. अखिल भारतीय मुस्लिम (Muslim) मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था व मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 या तीन दिवशी हे संमेलन होणार होते. मात्र, आता हे संमेलन जूनमध्ये होणार असून, त्या तारखा लवकर जाहीर करू, अशी माहिती स्वागताध्यक्ष तन्वीर खान (तंबोली) यांनी दिली आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात विविध परीक्षा आहेत. त्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात बसगाड्या सुरू नाहीत. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल ते मे महिन्यादरम्यान रमजानचा महिना येतो. हे सारे ध्यानात घेता रसिक आणि सर्वसामान्यांची अडचण होऊ नये म्हणून हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. आता जून महिन्यात हे संमेलन होणार असून, त्याच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती तंबोली यांनी दिली आहे.