Girish Mahajan : साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं…गिरीश महाजनांकडून डायरेक्ट वॉर्निंग
"काही जण म्हणतात साधू ग्राम दुसरीकडे हलवावे. साधू ग्राम जिथे हजारो वर्षांपासून होतं, तिथेच होणार. साधू ग्राम इथे होतं, आहे आणि राहणार" असं हरीगिरी महाराज म्हणाले.

नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे. या साधुग्रामसाठी झाडं तोडण्यात आली आहेत. जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा याला विरोध आहे. जी झाडं तोडण्यात येणार, त्याजागी नव्या झाडांची लागवड करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आजपासून 15000 झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला गिरीश महाजन तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू महंत उपस्थित आहेत. त्र्यंबकेश्वरच्या 10 तसेच नाशिकच्या 3 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित आहेत. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी 15000 वृक्ष लावले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1000 वृक्षांचे रोपण होणार आहे.
“गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला आपले दोन नेत्र समजतात. पर्यावरण आणि स्वच्छता याचा आम्ही संदेश देतोय. गोदावरी स्वच्छतेसाठी आमच्यासोबत अनेकांनी सहभाग घेतला आहे. जुना आखाडाने 15000 वृक्षांच्या लागवडीचा संकल्प केला आहे. साधुग्राममध्ये झाडं कापली जाणार असं मला कळलं. गिरीश महाजन यांनी 18000 झाडं लावण्याचा संकल्प केला. संपूर्ण राज्यात देखील अशाच पद्धतीने झाडं लावावीत. झाडांच्या शिफ्टिंगची व्यवस्था करावी अशी आमची अपेक्षा आहे” असं अखिल भारतीय आखाडा परिषद महामंत्री हरीगिरी महाराज म्हणाले.
वामपंथी विचाराचे काही लोक आड येत आहेत
“स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वृक्ष प्रेमी आहेत. आवश्यकता पडली तरच वृक्षांचे पुनर्रोपण होणार. आवश्यकता नसल्यास झाडं तिथेच राहणार, त्यामुळे वादच नाही. काही लोक विकासाला आड येतात. समृद्धी महामार्ग व्हावा असे काहीना वाटत नाही. वापी-त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्ता काहींना होऊ द्यायचा नाही. वामपंथी विचाराचे काही लोक आड येत आहेत. कुंभमेळ्यासाठी 150 किलोमीटर पर्यंत शहराचा विकास होणार. आम्ही उज्जैन मध्ये रामघाटवर स्नान करतो तर तिथेच स्नान करणार” असं हरीगिरी महाराज म्हणाले.
जी झाडं काढली त्याचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करु
“गेल्या कुंभमेळ्यात जेवढ्या राहुट्या होत्या, तेवढ्याच यावेळी लावणार. आम्हाला काही झाडं, झुडूपं काढावे लागतील असं आम्ही सांगितलं. जी झाडं काढली त्याचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करु. गेल्यावेळेची झाडं 80 टक्के जगली आहेत. माझे अनेक कार्टून बनले. मला करवत घेऊन दाखवण्यात आलं” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
काहीजण बोलण्याच्या ओघात जास्त बोलून गेले
“निसर्गावर आमच्या पंतप्रधानांचे प्रेम आहे. काहीजण बोलण्याच्या ओघात जास्त बोलून गेले. कुंभमेळ्याची गरज काय, साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं आम्ही खपवून घेणार नाही. 15000 पैकी एकही झाड मरणार नाही. 1300 किलोमीटर वरून आम्ही झाडं आणली. हैदराबादवरून मी राजमुंद्रीला गेलो. आता 2000 झाडं आली आहेत” असं गिरीश महाजन म्हणाले.
