
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज निशाणा साधला. नाशकात पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपने हा देश धार्मिक होता, तो धर्मांध केल्याचा घणाघात घातला. त्यांनी मोदींच्या अनेक धोरणांवर टीका केली. 2014 नंतर देश खड्ड्यात गेल्याचं विधान केलं. त्यांनी पाकला शिव्या देणं सोपं आहे, असे म्हणत मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा खरपूस समाचार घेतला. काय म्हणाले राऊत?
2014 नंतर देश खड्ड्यात
देशभरात तिरंगा फडकला आहे. पण देशात आजही कायदा-सुरक्षा, गरीबी, भूक यांची मोठी समस्या आहे. देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षांचे झाले आहे. देश नक्कीच प्रगतीपथावर गेला आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात एक सुई आणि धागा ही मिळत नव्हता.आज तो देश अनेकबाबतीत पुढे गेला. त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वांनाच जाते. आज काही लोकांना वाटते की या देशाला 2014 साली स्वातंत्र्य मिळाले. पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला नाही तर खड्ड्यात गेला आहे. धार्मिक फूट ही देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक ठरत आहे.
स्वातंत्र्या आधारे आणि स्वातंत्र्यानंतर स्वदेशीचा नारा काँग्रेसने दिला आहे. लोकमान्य टिळक आणि जवाहरलाल नेहरू यांनी तो नारा दिला म्हणून तर अंगावर खादी आली ना, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. इतकेच नाही तर मोदींनी अगोदर स्वदेशीचा अंगिकार करावा मग स्वदेशीचा नारा द्यावा असा टोला त्यांनी लगावला. आता त्यांच्या कारकिर्दीचे अखेरचे दिवस सुरू झाले आहे. ते एकदिवस नेहरू टोपी सुद्धा घालतील असे भाष्य राऊतांनी केले. मोदी हे काँग्रेसवादी, गांधीवादी, नेहरूवादी झाल्याचे राऊत म्हणाले.
मोदींमध्ये तितकी हिम्मत नाही
ज्यांनी देश घडवला, त्यांचच, नेहरूंचंच नाव मोदी घेतात. ट्रम्प अथवा चीनविरोधात बोलण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही असा टोला राऊतांनी हाणला. ट्रम्प रोज देशाला शिव्या घालतोय, मोदींना शिव्या घालतोय, त्याचे नाव घ्या. त्यांचे नाव घ्यायला घाबरत आहेत. पाकिस्तानला इशारा देणं, शिव्या देणं सोपं आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे, हे मोदी कसं विसरतात. लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये, अशी टीका राऊतांनी केली. मोदींनी ट्रम्पला सुनावले पाहिजे आणि चीनला दम दिला पाहिजे असे राऊत म्हणाले.