शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच?; राज ठाकरे यांचा दावा काय?

| Updated on: Mar 09, 2024 | 2:03 PM

आरक्षण हा फक्त मराठ्यांचा विषय नाही, प्रत्येक राज्यातील त्या त्या समाजाचा विषय आहे. एका जातीचा विषय कोर्टात गेला तर प्रत्येक राज्यातील जाती कोर्टात जातील आणि देशभर आरक्षणाचा विषय पेटेल. जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टातून होऊ शकत नाही, त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन घ्यावं लागेल, पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत अधिवेशन होऊ शकत नाही, कधी तरी वकिलांशी बोलून बघा, मी खोटं सांगत नाही.

शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच?; राज ठाकरे यांचा दावा काय?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 9 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असं मी मानतच नाही. शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे, असं माझं मत आहे, असा दावा करतानाच शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकत्रच आहे, असा दावाच राज ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होता. यावेळी राज ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी मनसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी मनसेला पक्षनिधी म्हणून 15 लाखाचा निधी दिला.

मी जेव्हा बोलतो आणि तुम्ही रिअॅक्ट होता. पण आपण जे करतोय ते लोकांपर्यंत जातंय. मी नाशिक आणि कल्याण डोंबविलीत गेलो होतो. तिथे अनेक माता भगिंनी मला भेटल्या. त्यांनी माझा हात पकडून, बाबा रे विश्वास तुझ्यावरच आहे, असं म्हटलं. विश्वास टिकवणं हे महत्त्वाचं आहे. त्याचीच आज शपथ घ्यायची आहे. बाकीच्यांनी विश्वास गमावला आहे. कोण कुठे आहे हे कळत नाही. कुणाचं नाव घेतलं तर तो कुठे आहे हे विचारावं लागतं, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची माती होतेय

त्या दिवशी नाट्यसंमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. पण कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. पण सर्व आले होते एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही सर्व आतून एकच आहेत. शरद पवार आणि अजितदादा आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची माती होते. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे, असं राज म्हणाले.

भूलथापांना बळी पडू नका

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मी गेलो होतो. मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाहीये. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा मोर्चे निघाले होते. सर्व मुंबईत आले. काय झालं पुढे? मराठा बांधवांना हीच विनंती आहे, यांच्या भुलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याची आश्वासने दिली जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

विष कालवायला नेते आहेत

आज नोकऱ्यांचा विषय आहे. शिक्षणाचा आहे. बाहेरच्या राज्यातील लोकं पोसायची आणि आम्ही आंदोलनं करायची हेच सुरू आहे. इथल्या तरुणांना नोकऱ्या देणं या राज्याला सहज शक्य आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं राज्याला शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये, मराठी म्हणून एकत्र राहू नये, तो वेगवेगळा असावा. वेगवेगळ्या जातीत राहावं. त्यासाठीचं विष कालवायला नेते बसलेलेच आहेत. मराठ्यांचं झाल्यावर ओबीसी उभं राहणार, त्यानंतर अजून कोणी उभे राहणार. आपल्याकडे महापुरुषांना जातीत वाटलेलं आहे. याच लोकांनी वाटलेलं आहे. तुमची जेवढी मते विभागली जातील तेवढं यांच्या फायद्याचं आहे. मराठी म्हणून एकत्र येणं देशाला आणि यांनाच नको. हे विष कालवण्याचे धंदे ओळखा, असं ते म्हणाले.