झटपट श्रीमंतीचा नाद नडला, भावासोबत मोठं कांड; एका चुकीने सगळं उद्धवस्त, काय घडलं?
खारघरमध्ये क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली १.०३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फेसबुकवर बनावट प्रोफाइल वापरून आरोपीने पीडित व्यक्तीशी संपर्क साधला आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले.

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, अशा आमिषाने तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल सायबर सेलच्या गुन्हे शाखेकडून एकाला अटक करण्यात आली आहे. जुबेर शमशाद खान (34) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला मुंब्रामधून अटक करण्यात आली आहे.
आरोपीने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून, क्रिप्टो गुंतवणुकीद्वारे भरघोस नफा मिळेल, अशी पोस्ट केली. पीडित व्यक्तीने या पोस्टवर विश्वास ठेवून संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू झाला. आरोपीने खोटं नाव, बनावट छायाचित्रे आणि बनावट ओळख सादर करत पीडिताचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रक्कम परत देत परताव्याचा आभास निर्माण केला. यामुळे गाफील झालेल्या पीडिताने टप्प्याटप्प्याने 78.82 लाख रुपये आरोपीच्या सांगण्यानुसार पाठवले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने, तसेच आरोपीने संपर्क तोडल्याने फसवणुकीचा उलगडा झाला.
सापळा रचून अटक
पीडित व्यक्तीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खारघर 203/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 चे कलम 66(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल सायबर सेलच्या पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत मुंब्रा येथे सापळा रचून अटक केली.
आरोपीकडून 1.03 कोटी रुपये घेतल्याची कबुली
यावेळी आरोपीकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये पीडिताशी संबंधित चॅटचे व आर्थिक व्यवहाराचे डिजीटल पुरावे सापडले आहेत. प्राथमिक तपासात आरोपीने 1.03 कोटी रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेणे सुरू केले असून इतर सहआरोपी असल्याची शक्यता नवी मुंबई पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
