पोरं अभ्यासात मग्न होती अन्… नवी मुंबईत मोठी दुर्घटना, शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे विद्या भवन अपार्टमेंटमध्ये ट्यूशन क्लास सुरू असताना स्लॅब कोसळून ९ वर्षीय मनीष म्हसेचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी मुंबईतील काळजाचा थरकाम उडवणारी एक घटना घडली. नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात गुरुवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. सेक्टर २ मधील विद्या भवन अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळल्याने ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावेळी शिक्षिकेसह अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी ४.३० ते ५.०० च्या सुमारास ही घटना घडली. ही सर्व मुलं नेहमीप्रमाणे ट्यूशनमध्ये शिक्षण घेण्यात मग्न होती.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय शिक्षिका श्यामली चौधरी या फ्लॅट क्रमांक ०२ मध्ये ५ ते १५ वयोगटातील सुमारे १२ मुलांना होम ट्यूशन देत होत्या. ही सर्व मुले अभ्यास करत असताना अचानक छताचा स्लॅब कोसळला. यावेळी खूप मोठा आवाज आला. या घटनेमुळे ट्यूशनसाठी आलेली मुलं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी जखमींना तातडीने वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथे या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच यावेळी तातडीने अग्निशमन दलाच्या पथकाला बोलवून स्लॅब बाजूला करण्यात आला. यावेळी सर्व मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून तात्काळ विविध रुग्णालयांत हलवण्यात आले. दुर्दैवाने, या अपघातात मनीष म्हसे या ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
जखमींची यादी
- शिक्षिका: शामली चौधरी (५३ वर्षे)
- निशिका धनवडे (१३ वर्षे)
- आयशा खान (११ वर्षे)
- देवांश पुजारी (१२ वर्षे)
- सिद्धांत गुप्ता (९ वर्षे)
- राजदीप वरखडे (११ वर्षे)
- तन्वी सचिन श्रीवास्तव (१० वर्षे)
- रुद्र प्रवीण पाटील
- प्रिन्स सोनी (१४ वर्षे)
- कुलसुम खान (१३ वर्षे)
- पार्थ खैरनार (१२ वर्षे)
- आराध्या धनावडे ही मुलगी सुरक्षित असून तिला तिच्या पालकांनी घरी नेले आहे.
महापौरांकडून जखमींच्या कुटुंबियांचे सांत्वन
या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींच्या कुटुंबियांचे सांत्वन करत योग्य उपचारांचे आश्वासन दिले.
सर्वांनाच मोठा धक्का
दरम्यान ही तीन मजली इमारत १९९६ मध्ये बांधण्यात आली होती. तिला महापालिकेकडून सीसी आणि ओसी दोन्ही मिळाले होते. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. त्यामुळे स्लॅब नेमका का कोसळला, याचे कारण शोधण्यासाठी महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवाशांची सोय अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक इमारतीत करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
