पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आवश्यक साधनसामुग्री आणि वाहनांसह मदतकार्य पथके तसेच औषधसाठ्यासह वैद्यकीय पथके तेथील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार त्वरित रवाना केलीत.

पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना
chiplun flood

नवी मुंबई : कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडूनही सिंहाचा वाटा उचलला जात आहे. कोकण आणि इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीतून तेथील जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आवश्यक साधनसामुग्री आणि वाहनांसह मदतकार्य पथके तसेच औषधसाठ्यासह वैद्यकीय पथके तेथील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार त्वरित रवाना केलीत.

24 जुलैला 43 जणांचे आणि 25 जुलैला 20 जणांचे मदतकार्य पथक महाडला

यामध्ये 24 जुलैला 43 जणांचे आणि 25 जुलैला 20 जणांचे मदतकार्य पथक महाडला असणार आहे. तसेच 26 जुलैला 40 जणांचे मदतकार्य पथक कोल्हापूरला स्वच्छता साधनांसह कार्बेलिक पावडर, ब्लिचिंग पावडर तसेच कोव्हिडच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशकाच्या स्प्रेईंग टीमसह पाठविण्यात आले. याशिवाय 25 जुलैला डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसह 15 जणांचे वैद्यकीय पथक चिपळूणला आणि 27 जुलैला 24 जणांचे वैद्यकीय पथक महाडला मोठ्या प्रमाणात औषधसाठ्यासह पाठविलेले आहे. ही मदतकार्य पथके तेथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मनोभावे मदतकार्य करीत आहेत.

बांगर यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर बारीक लक्ष

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर बारीक लक्ष असून, ते सर्व बाबींचा नियमित आढावा घेत आहेत. या मदतकार्याच्या नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे पूरग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत. त्या अनुषंगाने चिपळूणमधील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार 206 स्वयंसेवकांची आणखी दोन जम्बो मदतकार्य पथके चिपळूणकडे रवाना करण्यात आलेली आहेत. आहेत. त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी महेंद्र सप्रे यांच्यासह स्वच्छता अधिकारी विजय पडघन, स्वच्छता निरीक्षक मिलिंद तांडेल, महेश महाडिक, मनीष सरकटे, संजय शेकडे, अरुण पाटील, भूषण सुतार, विजय चौधरी यांच्यासह 206 स्वयंसेवक सहभागी आहेत. या पथकासोबत 2 फायर टेंडर आणि 6 बसेस आणि 3 जीप रवाना झालेल्या आहेत.

पथक जंतुनाशक फवारणी साहित्यासह महाड व चिपळूणमधील मदतकार्यासाठी रवाना

या आधीच्या दिवशीही 31 जुलै रोजी स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील आणि विजय नाईक आणि 40 स्वयंसेवकांचे मदतकार्य पथक स्वच्छता साहित्य व कोव्हिडच्या अनुषंगाने जंतुनाशक फवारणी साहित्यासह महाड व चिपळूणमधील मदतकार्यासाठी रवाना झाले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बालाजी ठाकूर व डॉ. तेजस थोरात हे महानगरपालिकेचे आणि डॉ. मोहित भोसले व डॉ. मोईद्दीन अहमद हे तेरणा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश असलेले 15 जणांचे वैद्यकीय पथक औषधसाठ्यासह 31 जुलै रोजी महाड आणि चिपळूण येथील आरोग्य रक्षणासाठी रवाना झाले आहेत. या दोन्ही पथकांनी महाडमध्ये आपले काम सुरू केले असून, हे पथक पुढे चिपळूणलाही जाणार आहे. या पथकांसोबत 2 बसेस, 2 जीप, 2 रुग्णवाहिका, वॉशिंग टॅंकर, प्रेशर वॉशिंग टँकर अशी वाहने पाठविण्यात आलेली आहेत.

आवश्यक वाहनेही नवी मुंबई महापालिकेमार्फत वेळोवेळी पाठविली

या मदतकार्य व वैद्यकीय पथकांप्रमाणेच पुरामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी आवश्यक वाहनेही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी पाठविण्यात आलेली असून, महाड भागात 1 जेसीबी, 3 टँकर, 3 मिनी टिपर, 1 डम्पर कार्यरत आहे, याशिवाय कोल्हापूर भागात 1 सक्शन युनिट कार्यरत आहे. 31 जुलैला महाड – चिपळूणसाठी रवाना झालेल्या मदतकार्य पथकासोबत 1 वॉशिंग टॅंकर, 1 प्रेशर वॉशिंग टॅंकर, 2 सक्शन युनिट पाठविण्यात आलेली आहेत.

आरोग्य या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज

याशिवाय 1 सक्शन युनिट इचलकरंजी भागात पाठविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तिन्ही वैद्यकीय पथकांसोबत रुग्णवाहिका तसेच औषधसाठ्यासह मेडिसीन वाहन पाठविण्यात आलेले आहे. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्य या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक साधनसामुग्री, वाहने व औषधसाठ्यासह वैद्यकीय आणि मदतकार्य पथके मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त भागात पाठवून मदतकार्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. या माध्यमातून तेथील परिस्थिती सुरळीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मोलाची मदत होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस, स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश

लाखो-कोट्यवधींच्या कार, चोरीसाठी चक्रावून सोडेल अशा टेक्निकल पद्धतीचा वापर, अट्टल कारचोर अखेर जेरबंद

Navi Mumbai Municipal Corporation’s lion’s share for flood victims, a team of 206 volunteers sent to Chiplun

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI