
Ganesh Naik Criticized Eknath Shinde: नवी मुंबईत शिंदेसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा उफळला आहे. महायुतीमधील या दोन्ही घटक पक्षात नवीन मुंबईत मात्र मुष्ठीयुद्ध सुरू आहे. महापालिका निवडणूक जवळ येताच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेतून भ्रष्टाचाराचे आरोप करतात नाईकही चवताळले आहेत. त्यांना नाईकांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. उन्माद कराल तर तो मोडण्याची माझ्याकडं ताकद असल्याचे त्यांनी सुनावले. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पटली आणि घोडे फरार करेल असा इशारा देतानाच नाईकांनी घोडेच बेपत्ता करण्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद अत्यंत विकोपाला पोहचल्याचे दिसून येत आहे. हा इशारा खासदार नरेंद्र म्हस्के यांना तर नाही ना अशी पण एक चर्चा रंगली आहे.
14 गावांच्या समावेशावरून तुफान
नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरून त्यांच्यात अगोदरच ठिणगी उडाली होती. तीन वेळा मी पालकमंत्री असताना मला यासाठी विश्वासात घेतले नाही. तुमच्या अगोदर गणेश नाईक पालकमंत्री होते हे लक्षात ठेवा. तुम्ही नाईकांच्या मतदारसंघात 14 गावं येणार आहेत, यावरून सगळ्यांना हलक्यात घेता असं वाटतंय, मला हलक्यात घेऊ नका असा दमही नाईकांनी भरला. मी हुकूमशहा असतो तर जनतेने आपल्याला 25 वर्षे निवडून दिलं नसतं. तुम्ही उन्माद करणार असाल तर तो काढण्याची माझ्याकडं ताकद आहे, असा इशाराही गणेश नाईकांनी दिला.
ईडीकडून करा चौकशी
नवी मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी गणेश नाईकांनी केली. नवी मुंबई महापालिकेची 3 हजार कोटींची एफडी 800 कोटींवर कशी आली असा सवाल करत त्यांनी हे कोणामुळं झालं असा सवाल त्यांनी केला. सिडकोचा प्रशासक कोणत्या नेतृत्वाखाली काम करत होते असा सवाल त्यांनी विचारला. शहराच्या विकासासाठी जे भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. ते भूखंड सिडकोने विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी राज्य सरकारची परवानगीही घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहराचा विकास मोठा की यांच्या हरामाचा पैसा मोठा? असा सवाल त्यांनी केला. ईडीने नवी मुंबई महापालिकेचे स्पेशल ऑडिट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येते. त्यामुळे युतीत मीठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. शिंदेंचे वर्चस्व वाढू नये यासाठी नाईकांनी दंड थोपाटल्याचे चित्र दिसत आहे.