मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही पावसाचा कहर, 12 तासात 200.88 मिमी पाऊस

| Updated on: Jul 18, 2021 | 7:22 PM

नवी मुंबई शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले.

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही पावसाचा कहर, 12 तासात 200.88 मिमी पाऊस
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. दरम्यान, नवी मुंबई शहरात सरासरी 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Navi Mumbai Records Over 200 MM Rain In last 12 Hours)

नवी मुंबईत शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे 6 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. या काळात एक शॉर्टसर्किट तर एक गॅस लिकेजची घटनादेखील समोर आली आहे. अवघ्या 12 तासांत नवी मुंबई शहरात 200.88 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, 24 विभाग कार्यालये, मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि 25 सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल आदी सर्व यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती. त्याचबरोबर महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालय आणि उपनगरीय रुग्णालये यांना देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध 60 ठिकाणी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर या पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील महापालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या.

रात्री 11 वाजेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे 4 वाजेनंतर कमी झाला. रात्री 11 ते पहाटे 4 या साधारणपणे 5 तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे 226.82 मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बरसला, 2 तासाच्या पावसाने वसई-विरार-नालासोपाऱ्यात हाहा:कार उडवला!