Raigad Boat : ‘त्या’ संशयास्पद बोटीत बंदूकच नव्हे तर तलवारी आणि चाकूही सापडले; तपास यंत्रणांचे धाबे दणाणले

| Updated on: Aug 19, 2022 | 4:51 PM

Raigad Boat : संशयास्पद बोट आढळल्याने सिंधुदुर्गात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. ही बोट सापडल्यानंतर पोलिसांनी काल सायंकाळपासून समुद्र किनारी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी होड्या किनाऱ्यावर येतात त्या भागात अधिक गस्त वाढवण्यात आली आहे.

Raigad Boat : त्या संशयास्पद बोटीत बंदूकच नव्हे तर तलवारी आणि चाकूही सापडले; तपास यंत्रणांचे धाबे दणाणले
'त्या' संशयास्पद बोटीत बंदूकच नव्हे तर तलवारी आणि चाकूही सापडले; तपास यंत्रणांचे धाबे दणाणले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हरीहरेश्वर: हरीहरेश्वरच्या (Harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर एक संशायस्पद बोट (Raigad Boat) सापडली आहे. ही बोट ओमानची असल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीत हत्यारांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बोटीत एके-47 आणि जिवंत काडतूसे सापडल्याचं काल सांगितलं जात होतं. पण या बोटीची तपासणी केली असता बोटीत दोन तलवारी आणि चाकूही सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बोटीतून बंदूका, तलवारी आणि चाकू भारतात आणण्यामागचे कारण काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच या घटनेनंतर कोकण (konkan) आणि पुण्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएसचे डीआयजी परमजीत सिंह दहिया आणि रायगडचे एसपी अशोक दुधे हे घटनास्थळी असून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहेत. तसेच हरीहरेश्वर परिसरातील हॉटेल आणि लॉजवर पोलिसांनी धाडसत्रं सुरू केलं असून संशयितांची चौकशी केली जात आहे.

राजयगड जिल्ह्यातील हरीहरेश्वरमध्ये एका बोटीत 3 एके-47 रायफल, 600 हून अधिक जिवंत काडतूसे, दोन तलवारी आणि चाकू सापडले आहेत. या बोटीची अजून तपासणी सुरू आहे. या बोटीत अजून काडतूसे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय चौकशी एजन्सी, कस्टम, एटीएस, क्राईम ब्रँच आणि लोकल पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी आमची चौकशी सुरू आहे. आम्ही नावेतून काही कागदपत्रे मिळवली आहेत. तसेच बोटीच्या आत आणि बाहेरच्या वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनित अग्रवाल यांनी काल सांगितलं.

हे सुद्धा वाचा

बोट वाहत वाहत आली?

दरम्यान, शस्त्रास्त्र साठा असलेली ही बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. रिपोर्टनुसार, ओमान सेक्युरिटीची ही स्पीड बोट आहे. बोटीत एकही व्यक्ती नाहीये. ही बोट वाहत वाहत भारतात आली आहे. साधारणपणे या परिसरात पाकिस्तानी बोट मिळण्याची शक्यता अधिक असते. कारण पाकिस्तानकडून हेरगिरी केली जाते. मात्र, ही बोट पाकिस्तानची आहे की नाही याची माहिती मिळाली नसून तपास यंत्रणा त्या दिशेनेही तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.

झाडाझडती आणि हायअॅलर्ट

दरम्यान, संशयास्पद बोट आढळल्याने सिंधुदुर्गात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. ही बोट सापडल्यानंतर पोलिसांनी काल सायंकाळपासून समुद्र किनारी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी होड्या किनाऱ्यावर येतात त्या भागात अधिक गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच संशयास्पद होड्यांची तपासणीही केली जात आहेत. तसेच आजूबाजूच्या लॉज आणि हॉटेल्सवरही झाडाझडती करण्यात येत आहे. संशयास्पद व्यक्तिंची चौकशी केली जात आहे. तसेच स्थानिक मच्छिमार, तट रक्षक दल आणि वॉर्डन यांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी सुरू केली आहे. संशयास्पद व्यक्तींची माहिती देण्याचं आवाहन देण्यात आलं आहे. त्याशिवाय गोव्यातून आणि सिंधुदुर्गा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.