घर का न घाट का, नवाब मलिक मोठा निर्णय घेणार? अजित पवार गटात काय घडतंय?

नवाब मलिक यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक ही अपक्ष लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे ही अजित पवार गटाचीच खेळी असल्याचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गटात नेमकं काय सुरु आहे? याचा सस्पेन्स वाढला आहे.

घर का न घाट का, नवाब मलिक मोठा निर्णय घेणार? अजित पवार गटात काय घडतंय?
नवाब मलिक आणि अजित पवार
| Edited By: | Updated on: Jul 16, 2024 | 6:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे आगामी निवडणूक ही अपक्ष लढण्याची शक्यता आहे. महायुतीकडून नवाब मलिक यांना विरोध होत असल्याने ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची खेळी असू शकते, अशीदेखील चर्चा आहे. नवाब मलिक अणूशक्तीनगरमधून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. मलिक हे सध्या जामिनावर आहेत. नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याबाबत भाजपचा आक्षेप आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत सामील केलं जाऊ नये, अशी विनंती केली होती. तर काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर विचार केला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर नवाब मलिक हे अपक्ष लढू शकतात. अजित पवार गटाकडून ही वेगळी खेळी केली जाऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. पण तसं असलं तर अजित पवार गटासाठी हा धक्का सुद्धा असू शकतो, अशी देखील चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नवाब मलिक हे अणुशक्ती नगरचे प्रतिनिधित्व करतात. ते सध्या तिथले आमदार आहेत. तिथूनच आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक अपक्ष लढण्यामागे वेगवेगळी चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला मुस्लिम समाजाने मतदानात साथ दिली नव्हती. त्यावेळी महाविकास आघाडीकडून प्रचारात मोठा दावा करण्यात आला होता. महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर देशात संविधानात बदल होणार ही गोष्ट मुस्लीम समाजात मोठ्या प्रमाणत बिंबवली गेली होती. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाची मतं आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नवाब मलिक यांच्याकडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मलिकांना विरोध

दुसरीकडे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्याबाबत भाजपचा प्रचंड विरोध आहे. नवाब मलिक हे वैद्यकीय उपचारासाठी जामिनावर बाहेर आहेत. जेलमधून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हा ते अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले होते. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून त्यांना महायुतीत सहभागी करुन घेऊ नये, अशी भूमिका मांडली होती. “नवाब मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले होते.

अजित पवार गटाला धक्का

नवाब मलिक यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा प्रत्यक्ष फटका हा अजित पवार गटालादेखील बसणार आहे. कारण नवाब मलिक हे गेल्या अनेक वर्षांपासून अणुशक्तीनगरचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचं तिथे चांगलं राजकीय वर्चस्व आहे. तसेच मलिक हे मोठे नेते आहेत. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्याक मंत्रीदेखील होते. त्यामुळे नवाब मलिक या जागेवर जिंकून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अपक्ष लढले तर त्याचा थेट फटका अजित पवार गटाला बसणार आहे. कारण अजित पवार गटाची एक जागा कमी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार गटाने आता नवाब मलिक यांना नाकारल्यास आगामी काळात मलिक हे अजित पवार गटासोबतच राहतील याची शक्यता कमी आहे. कारण नंतर ते शरद पवार गटासोबतही जाऊ शकतात, अशीदेखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.