Chhagan Bhujbal : शरद पवार भाजपमध्ये सामील होतील? छगन भुजबळ यांचं एका वाक्यात उत्तर काय? चर्चांना उधाण
Chhagan Bhujbal : "उद्घाटनासाठी जातो त्यावेळी अनेक लोक फोटोसाठी येत असतात. आम्ही काय करायचे, त्याच्यामुळे बावनकुळे यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्याला सांगितले नाही मी तुला फोटो काढू देत नाही. तो नेमकाच आमचा कार्यकर्ता असला परत आपली अडचण होते. त्यामुळे असे प्रकार लहान मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घडत असतात, याचा दोष नेत्यांना देऊन चालत नाही" असं छगन भुजबळ म्हणाले.

शरद पवार भाजपचे हस्तक आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. “त्यांना जास्त माहिती मिळत असेल. त्यांना कुठून माहिती मिळते ते मला माहिती नाही. परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं, भाजपचा स्वीकार करणे शक्य वाटत नाही” असं छगन भुजबळ म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे 6 व्या रांगेत होते, त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “मला काही कल्पना नाही. सगळे नेते आहेत ना. खासदार सर्व राज्याचे लीडर लोकच जमतात ना. अशा काही छोट्या गोष्टीमुळे आघाडीवर काही परिणाम होतो असं मला वाटत नाही”
खालिद का शिवाजी सिनेमा प्रदर्शनाला ब्रेक त्यावरही छगन भुजबळ यांना विचारलं. “मला कल्पना नाही का ब्रेक लावलेला आहे?. परंतु काही हिंदू संघटनांनी मागणी केली होती. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेलाय, असं त्यांचं म्हणणं होतं. तो सिनेमा मी काही पाहिलेला नाही. त्यामध्ये चुकीचं काय मला काही माहीत नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.
मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही
मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही, त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “दोन्ही विषय फार वेगवेगळे आहेत. एखाद्या सिनेमाला विरोध होणं, त्याची अनेक कारणे असतात किंवा ते समज दूर केले पाहिजेत. हा दुसरा वेगळा प्रश्न आहे” “मराठी सिनेमांना थेटर मिळत नाही, ही आपली तक्रार आजची नाही अनेक वर्षाची आहे. खरं म्हणजे मल्टिप्लेक्स हे सगळीकडे झालेत. मल्टीप्लेक्सचे धोरण सुद्धा मीच ठरवले होते. मीच मल्टिप्लेक्स या महाराष्ट्र मध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुंबई पुण्यामध्ये अनेक थिएटरच उद्घाटन केलं होतं. या अगोदर गुजरातमध्ये मल्टिप्लेक्स होते. आमचा पण समज होता की त्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात. तीनशे, दोनशेचे थिएटर असतात. परंतु काही लोक जे आहेत दाद देत नाहीत, हे खर आहे. त्यामुळे आंदोलनाला सुरुवात होते. आता या बाबतीमध्ये आशिष शेलार स्वतः लक्ष घालतील” असं छगन भुजबळ म्हणाले.
आता मी त्यांना कुठे विचारायला जातो, तुझा धंदा काय?
ड्रग्स प्रकरणातील जामीनावर असलेल्या आरोपीने बावनकुळे यांचा सत्कार केल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यावरही छगन भुजबळ बोलले. “मी तुम्हाला खरं सांगतो. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो, त्यावेळी कोण बसलेला आहे हे बघत नाही. दोन जण ओळखीचे असतात, चार जण अनोळखी असतात. आम्हाला वाटतं इथले कोणीतरी असतील. त्यातला एखादा कोण चुकीचा असेल. तो दोष पाहुण्यांचा नाही. माझ्याकडे सुद्धा अनेक लोक येत असतात. आता मी त्यांना कुठे विचारायला जातो, तुझा धंदा काय?. बाहेर काय करतोस. हे काय मी त्यांना विचारतो का?” असं छगन भुजबळ म्हणाले.
