Sunil Tatkare NCP : 12 तारखेच्या विलिनीकरणाचा शरद पवारांचा दावा खोडून काढताना सुनील तटकरेंनी काय उत्तर दिलं?
Sunil Tatkare NCP : सकाळपासून 17 जानेवारीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओत विलीनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते करत होते. त्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलं आहे.

“आता आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. आता दोन वाजता राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. त्यात सुनेत्रा पवार यांची निवड अपेक्षित आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. “राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर अधिकृत पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील” असं सुनील तटकरे म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदादा आमच्यात नाहीत हे दु:ख आम्ही पचवू शकत नाहीत. नजीकच्या कालावधीत त्यांचा अस्थिकलश पक्षाच्यावतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, खेड्यापाड्यात दर्शनासाठी नेणार आहोत. महाराष्ट्राला आपलं मानून, महाराष्ट्राला गतीमान, विकासाभिमुख नेतृत्व अजितदादांनी दिलं. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विलक्षण, झपाटून काम त्यांनी केलं. त्यांचा अस्थिकलश पक्षाच्या माध्यमातून आम्ही नेणार आहोत” असं सुनील तटकरे म्हणाले.
12 तारखेला विलिनीकरणाच्या घोषणेचं काय?
“मी आज एक व्हिडिओ पाहिला. त्यात बैठक दाखवलेली आहे. तुम्हाला माहितीय बारामती येथे कृषी प्रदर्शन झालं. त्यानंतर चहापानासाठी बैठक झाली. त्याचवेळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असा त्यांनी सांगितलं होतं” असं सुनील तटकरे म्हणाले. शरद पवार म्हणाले की, 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती. “त्याचा एक भाग असा आहे की, ज्या दिवशी चर्चा झाली त्या दिवशीची माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. आज विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर सविस्तरपणे बोलू”
तटकरे, पटेलांवर होणाऱ्या टीकेवर काय उत्तर?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका होतेय. त्यावर “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, परिवार, आमदार या जनभावना लक्षात घेऊन सामुदायिकरित्या निर्णय घेतला आहे” असं उत्तर दिलं.
इतकी घाई का?
“घाई झाली असं अनेकांना वाटत असलं तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ते काम पुढे होणं गरजेचं आहे. घाई करण्याचं कारण असं की जी घटना घडली ती न भरून निघणारी आहे” असं अनिल पाटील म्हणाले.
