2029 ला भाजपचे सर्व आमदार, सगळ्यांचा बाप म्हणून… बड्या मंत्र्यांचे मोठे विधान
धाराशिव येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. महाविकासआघाडीला इशारा देत त्यांनी भाजपचे मुख्यमंत्रीपद असल्याचे म्हटले.

मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी नुकतंच धाराशिव येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीला इशारा दिला आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा,” असे वक्तव्य नितेश राणेंनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा
नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. “२०२९ ला भाजपचे सगळे आमदार आले पाहिजेत,” असे नितेश राणे म्हणाले. कुणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले, तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणेंनी म्हटले.
यावेळी त्यांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना मिळालेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार घणाघात केला. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून लक्ष असते, म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाली,” असे नितेश राणे म्हणाले.
धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून संघर्ष
धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सध्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दरम्यान धाराशिव येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीला नितेश राणे उपस्थित होते. यावेळी ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, जिथे पक्षाच्या ध्येयधोरणांवर आणि आगामी रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच, मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
