नितीन गडकरी धमकी प्रकरणी NIA कडून महत्वाचे पाऊल, आरोपीने 100 कोटींची केली होती मागणी
nitin gadkari threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएने सुरु केला आहे. या तपासासाठी एनआयएचे पथक नागपुरात दाखल झाले आहे. त्यांनी नागपूर पोलिसांची बैठक घेतली आहे. जयेश पुजारा याची चौकशी पथक करणार आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरु केला आहे. यासाठी एनआयएचे पथक नागपूरला पोहचले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून 100 कोटींची खंडणी देखील मागण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याला ताब्यात घेतलं आहे.
अधिकारी नागपुरात दाखल
नितीन गडकरी धमकी प्रकरणात एनआयएचे अधिकारी नागपुरात दाखल झाले आहे. NIA चे दोन DIG स्तरावरील अधिकारी नागपुरात आले असून त्यांनी नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणी आरोपी जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला NIA ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेळगावातून केली होती अटक
याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. बेळगाव कारागृहातूनच त्याने फोन केल्याचा पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत, त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
बेंगळुरुमध्ये गुन्हा
एनआयएने नितीन गडकरी यांना धमकावल्याबद्दल बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला होता. आता जयेश पुजारी याचे लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची चौकशी एनआयए पथक करणार आहे.
14 जानेवारीला धमकीचा फोन केला
14 जानेवारी रोजी पुजारीने गडकरींच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन केला, ज्यात 100 कोटी रुपयांची मागणी केली आणि दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला. त्यावेळी ते शेजारच्या कर्नाटक राज्यातील तुरुंगात होते.
28 मार्च रोजी नागपूरला आणण्यात आले
पोलिसांनी सांगितले की, त्याने 21 मार्च रोजी आणखी एक फोन केला आणि त्याने 100 कोटी रुपये न दिल्यास हत्या करण्याची धमकी दिली होती. बेळगाव जेलमधून आरोपी जयेश पुजारी याच्याकडून दोन मोबाईल, दोन सीम कार्ड जप्त केले होते.
