उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  • संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 23:06 PM, 20 Feb 2021
उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

उस्मानाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पण कोरोना लस घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.(Kaustubh Divegavkar Corona positive even after vaccination)

2 पोलिसांना लस घेतल्यानंतरही कोरोना

घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

पुणे, नाशिकमध्ये लस टोचल्यानंतरही कोरोना

या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. नर्सला कोरोनाची लस टोचल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं ससूनचे डीन मुरलीधर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील 12 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे, असं निकम म्हणाले.

कोरोनातून बरे झाल्यावरही कोरोना

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते. तसेच नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; लस घेऊनही नर्सला कोरोनाची लागण

‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण

Kaustubh Divegavkar Corona positive even after vaccination