माणसं बोंंबलली, मी बाहेर पडलो आणि होत्याचं नव्हतं झालं, तळीयेतील बबन सकपाळांची कहाणी

रायगडच्या तळीये गावात डोंगरकडा कोसळून आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंतच्या टुमदार गावाचं रुपांतर स्मशानभूमीत झालं आहे.

माणसं बोंंबलली, मी बाहेर पडलो आणि होत्याचं नव्हतं झालं, तळीयेतील बबन सकपाळांची कहाणी
आपल्यावर ओढावलेल्या वाईट परिस्थितीचं बबन सकपाळ यांनी कथन केलं.

रायगड (तळीये) : रायगडच्या तळीये (Raygad Taliye Village) गावात डोंगरकडा कोसळून आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंतच्या टुमदार गावाचं रुपांतर स्मशानभूमीत झालं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आपल्या जवळचे नातेवाईक सोडून गेल्याने काय करावं आणि काय नको, असं त्यांना झालंय. आप्तेष्टांच्या आठवणींनी नातेवाईक धायमोकलून रडतायत. दुसरीकडे या घटनेत बचाववेल्या बबन सकपाळ यांनी या घटनेचा थरार टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितला.

अक्रित घडलं…घर पडलं… माणसं गेली…

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अक्रित घडलं… जोरदार पाऊस सुरु होता… माणसं आपापल्या घरात होती… त्याचवेळी डोंगरकडा अनेक घरांवर कोसळला. डोंगरकडा खाली येतोय हे दृश्य पाहून काही माणसं बोंबलत बाहेर पळाली. मी आणि माझी तीन मुलं, आम्हीही घराबाहेर पळालो… आम्ही बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं…. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अशा जड अंतकरणाने घटनेची आपबिती बबन सकपाळ यांनी सांगितली.

आमच्यावर वाईट आलीय…

आम्ही नवं घर बांधलं होतं. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण गुरुवारी अक्रित घडलं. पावसाने डोंगरकडा कोसळला. आमचं घरं कोसळलं… वसरं आलं.. वसरं आलं… असं बोंबलत आम्ही पळालो… तीन मुलगे मुंबईला आहेत, इथं तिघे राहात होतो.. आता काय घरात राहिलं नाही.. धान्य पाणी सगळं गेलं … मी कालपासून शेतात राहतोय.. काल वडापाव दिला होता, आता खायला काही नाही… अंथरुण पांघरुन नाही, अवस्था बिकट आहे, अशा शब्दात आपल्यावर ओढावलेल्या वाईट परिस्थितीचं बबन सकपाळ यांनी कथन केलं.

40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं!

महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाडली गेली आहेत.

तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन सुरु

तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. अनेक नातेवाईक आपल्या पाहुण्याला कधी बघायला मिळेल, याकडे डोळे लावून बसलेत. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली आहे.

(Baban Sakpal Feeling Emotional Maharashtra Raygad Taliye Village Landslide)

हे ही वाचा :

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू

Raigad Taliye Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले   

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI