नगर: काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच थेट आरोप केले आहेत. तांबे यांनी एबी फॉर्म वाटपाच्या घोळावरून नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे यांचा हा हल्ला ताजा असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांना घेरलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट हायकमांडकडे पटोले यांची तक्रार केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं थोरात यांनी हायकमांडला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पटोले प्रचंड अडचणीत सापडल्याची चिन्हे दिसत आहेत.