Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्याची लायकी काढली, एकदा तुम्ही जनतेतून..
Omraje Nimbalkar Uddhav Thackeray: खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या एका शिलेदारावर जहरी टीका केली. त्यांनी पहिल्यांदाच उद्धव सेनेवर हल्लाबोल चढवला. काय म्हणाले निंबाळकर?

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: या जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सहा खासदारांनी ठाकरे सेनेची साथ सोडली. त्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. तेव्हापासून निंबाळकरांनी उद्धव सेनेवर टीका केली नाही. पण आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टीकेला त्यांनी सणसणीत उत्तर दिले. त्यांनी उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अंबादास दानवे यांच्यावर खरमरीत टीका
ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची लायकी काढत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली. दानवेंच्या सोशल मीडियावरील पोस्टला ओमराजे यांनी प्रत्युत्तर दिले. 2029 ला धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान त्यांनी दिले. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल, अशी टीका त्यांनी केली. काही लोकांना काहीच काम नाही, उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची, असा टोला त्यांनी लगावला. एक दिवस माझ्यासोबत या आणि मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के तुम्ही फोन घेऊन दाखवा, असं आव्हानही ओमराजेंनी दानवेंना दिलं. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यातील फोटो एक्सवर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी “काय होतास तू काय झालास तू “अशी टीका केली होती. त्यावर निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
राणा पाटील यांच्यासोबत एकत्र प्रवास
मुख्यमंत्र्यांच्या वाहनात राणा पाटील यांच्यासोबत प्रवास करण्याबाबत ओमराजेंनी स्पष्टीकरण दिलं. जिल्ह्यातील शेतकरी, पाण्याचा प्रश्न आणि पीक विम्याच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्यासाठी मी गाडीत बसलो, त्या गाडीमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकही असल्याचं ओमराजेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलायचं म्हटलं तर कोणाचं तोंड बघण्याची गरज पडत नाही, असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटील यांच्यासोबतच्या प्रवासाचं राजकीय स्पष्टीकरण दिलं.
कैलास पाटील यांची दौऱ्यावर टीका
दोरखंड बांधण्याची काय गरज होती? शेतकरी दंगल करायला आले नव्हते. मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत म्हणून आम्ही आलो नव्हतो, अशी टीका उद्धव सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली. शेतकर्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. शेतकऱ्याची राख रांगोळी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाणी दौरा केला. पाहणी दौऱ्यामध्ये शेतात ते पण टाकून त्यावर सोयाबीन ठेवले. दंगल नियंत्रण पथकाच्या माध्यमातून रस्सी लावून बॅरिकेटिंग केली. साडेचार मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा संपवला, अशी टीका कैलास पाटील यांनी केली.
राणा जगजित सिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का
भाजपा आमदार राणा जगजित सिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का दिला, अंबादास दानवे यांनी व्हिडीओ पोस्ट करत दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना शेतकरी आपली व्यथा मांडायला जात असताना भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का दिला.धाराशिव येथील कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मुख्यमंत्री पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याचा दावा दानवे यांनी केला.