Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी कशाची वाट पाहाताय? उद्धव ठाकरे यांचा सरकारला रोखठोक सवाल
Uddhav Thackeray on Drought Damage Assessment: राज्य दुष्काळाने होरपळले आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. कालनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी सरकारला एक खणखणीत सवाल विचारला आहे.

राज्यात दुष्काळाने राहुटी ठोकली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील अनेक भागात बिकट परिस्थिती आहे. तर इतर जिल्ह्यांनाही मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यातील लातूर, धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना भेट दिली. आज ते पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला मोठा रोकडा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची अधिसूचना काढणार असल्याचे जाहीर केले असले तरी पंचनाम्याची प्रक्रिया कधी सुरू होणार यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्याविषयी उद्धव ठाकरे यांनी सरकारला रोखठोक सवाल केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. काही काही गावात मुख्यमंत्री केवळ दहा मिनिटे थांबल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांना दोरखंड लावून अडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मग मुख्यमंत्री कोणाला फसवत आहेत, हे देखावे कशासाठी करत आहात, असा सवाल त्यांनी विचारला. सरकार जर NDRF आणि SDRF च्या मदतीवर अवलंबून नसेल तर सरकार दुष्काळ का घोषित करत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
निकष कसले लावताय?
दुष्काळ कधी जाहीर करावा, त्याचे निकष काय असावेत याची चर्चा सुरू आहे. आता निकष काय पाहताय, तिकडं सगळं सुकलंय ते दिसत आहे. डोळे हेच तुमचे निकष असले पाहिजे. शेतकरी आज संपला आहे. त्याचं पीक हातचं गेलं आहे. मग तुम्ही कोणते निकष लावत आहात. काय म्हणजे तुम्हाला सगळं कागदावर आल्याशिवाय कळत नाही की आल्यावर सुद्धा तुमचं मन वळत नाही? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पंचनाम्यासाठी कशाची वाट पाहाताय?
कर्जमाफीची घोषणा झाली. यादी मागून यादी येत आहे. खरोखरी किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आकडेवारी जाहीर होत आहे. इतकी रक्कम दिली गेली, अशा बातम्या समोर येत आहे. फडणवीस म्हणत आहेत की बँकांची फायदा होणार नाही अशी कर्जमाफी होईल. पण किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. त्यांच्या खात्याते पैसा गेला. याची काही आकडेवारी आहे का. कोण तपासत आहे हे सर्व? आमच्या सरकारने अवघ्या 15 दिवसात कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली होती, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळाले, किती शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली, याची आकडेवारी आम्हाला हवी आहे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. तर पंचनाम्यासाठी 5 ऑक्टोबरची वाट का पाहताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यांनी यावेळी पीक विमा योजनेतील फसवेगिरीवरही सडकून टीका केली.
