Gokul: गोकुळमध्ये बॅकडोअर खेळी, आता कुणाची होणार एंट्री? मागील दाराने येणारे ते चार तज्ज्ञ संचालक कोण?
Gokul government-appointed directors: गोकुळसाठी महायुतीची खेळी यशस्वी झाली. राज्यपालांनी याविषयीचा अध्यादेश काढला. यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला. गोकुळमध्ये या चार तज्ज्ञ संचालकांची आता एंटी होणार आहे.

Gokul government-appointed directors: कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळमधील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गोकुळमध्ये चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या अध्यादेशाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. यामुळे 13 जागांचं बहुमत असणाऱ्या सतेज पाटील यांच्या आघाडीसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. महायुतीसाठी मागच्या दाराने गोकुळमध्ये एंट्रीचा मार्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण आहेत हे चार तज्ज्ञ संचालक?
पाच शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती
गोकुळच्या अटीतटीच्या निवडणुकीतील पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला. महायुती सरकारने पाच सदस्य नियुक्तीचा डाव साधला. गोकुळवर पाच शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच शासन नियुक्त संचालकांपैकी एक संचालक हे सहाय्यक निंबधक दर्जाचे अधिकारी असतील. तर चार जणांना संस्थेच्या कार्याचा अनुभव असेल, असे स्पष्ट करण्यात आले. चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. तर शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसेल. महायुतीच्या या बॅकडोअर खेळीने आता वातावरण तापलं आहे.
ते चार तज्ज्ञ संचालक कोण?
कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळमध्ये पाच शासननियुक्त सदस्य नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. राज्यपालांनी अध्यादेशाला मंजुरी दिली. त्यानुसार, गोकुळमध्ये शौमिका महाडिक, नाविद मुश्रीफ, अशोक फरकटे तर आणखी एकासह सहाय्यक निंबधक दर्जाचे अधिकारी असतील. विशेष म्हणजे नाविद मुश्रीफ हे या निवडणुकीत पराभूत झाले होते. पण आता त्यांची बॅकडोअर एंट्री झाली आहे.
सोमवारी संघर्ष मोर्चा
शासननियुक्त पाच संचालक नेमण्याचा आणि त्यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या शासन अध्यादेशाविरोधात आता कोल्हापूरात संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वात 9 नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.