
ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. तर खाली अन्न पडल्यामुळे उंदीर खाण्यासाठी आला असेल असा अजब दावा रुग्णालय अधीक्षकांनी केला होता. आता तरी रुग्णांची काळजी घ्या आणि उंदराचा बंदोबस्त करा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
मंत्र्यांचे त्वरीत कारवाईचे आदेश
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही चुकीची गोष्ट घडल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सरकारी इमारतीचं मेंटेनन्स असते हे बरोबर आहे. रुग्णांच्या जीवाशी असं होत असेल तर ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्या दुर्लक्ष केलं त्यावर 100% कारवाई करण्यात येईल. जे रुग्णालय आमच्या ताब्यात आहेत मेन्टेन्स साठी त्याच्या दुरुस्तीसाठी जो काही निधी लागेल ते आम्ही देऊ. थोडाफार आरोग्य विभागाकडून सुद्धा निधी या गोष्टीसाठी येणं गरजेचं असतं, असे ते म्हणाले.
आमदारांचा संताप
तर स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. या पूर्वी सुद्धा लोहा ग्रामीण रुग्णालयात प्रचंड तक्रारी होत्या. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर यानंतर थोडीफार परिस्थिती बदलले आहे. कंधार रुग्णालयात मी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. एखादा रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे, असं होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. यासंदर्भातचा अहवाल मी मागवेल सुधारणा झाली नाही तर मला ॲक्शन घ्यावी लागेल. मी जिल्हा शल्य चिकित्सकाला बोलून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधीक्षकांचा अजब दावा
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम यांनी मात्र यावर एक अजब दावा केला. रुग्णांनी खाली टाकलेले अन्न खाण्यासाठी उंदीर आले असावेत, असे ते म्हणाले. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो खेदजनक आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मिळाल्यास नुसार आम्ही काही दिवसांपासून उंदरांसाठी ट्रॅप लावले आहेत. काल जो घडलेला प्रकार आहे तो मानसिक रुग्ण ऍडमिट होता त्याला संवेदना कमी होत्या, संवेदना कमी असल्यामुळे तो उंदीर त्याला चावला होता. घडलेला प्रकार खरंच खेद जनक आहे.
दोन ते तीन वेळेस आम्ही स्वच्छता करतो आणि ग्रुप वर टाकतो. काही वेळेस रुग्णांकडून अन्नपदार्थ खाली पडले जातात आणि ते खाण्यासाठी उंदीर आल्याची शक्यता आहे. उंदीर कुणालाही चावला नाही रुग्णाच्या शरीरावर धावला आहे. इमारत खूप जुनी झाली आहे यासाठी आम्ही बांधकाम विभागासोबत पत्रे वार केला आहे त्यांचं काही उत्तर आलं नाही. आम्ही ट्रॅप आणि स्टिकिंग पॅड ठेवले आहेत, स्वच्छता आमची जोमाने चालू झाली आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.
रुग्णांनी व्यक्त केला संताप
उपचार घेत असलेल्या शायनाज बानू या महिला रुग्णाने सांगितले की, दोन दिवसापासून मी या ठिकाणी भरती आहे उंदीर येत आहेत चावत आहेत. याची सगळी देखरेख केले पाहिजे.दवाखान्यात रुग्णांचे देखभाल करा गोळ्या औषधाची सोय करा. उंदरामुळे भीती वाटत आहे, चावतील असं वाटतंय, असे त्या म्हणाल्या. दुसऱ्या एका महिला रुग्णाने जे उंदीर दिसत आहेत त्याची व्यवस्था करावी उंदीर दवाखान्यामध्ये आलाच नाही पाहिजे. पेशंटला किंवा पेशंट सोबत कोणी असेल तर त्याला त्रास होऊ नये, अशी मागणी केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.