VIDEO | “साहेब घरी पोरं-बाळं उपाशी आहेत, एकदा पुलावरुन सोडा” सांगलीत पूरग्रस्त महिलेची आर्त विनवणी

| Updated on: Jul 27, 2021 | 9:12 AM

मोठा पूल खचल्याचे कारण देत बांधकाम विभागाने रामलिंग बेटाच्या पुलावरुन चालत जाण्यास बंदी घातली आहे. परंतु अस्मानी संकटाला तोंड देताना जनावरं आणि लहान मुलांना सांभाळणाऱ्या महिलांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली

VIDEO | साहेब घरी पोरं-बाळं उपाशी आहेत, एकदा पुलावरुन सोडा सांगलीत पूरग्रस्त महिलेची आर्त विनवणी
सांगलीतील पूरग्रस्त महिलेची विनवणी
Follow us on

सांगली : “साहेब आमची पोरं बाळं उपाशी आहेत. वाट बघत असतील. एकदा आम्हाला सोडा, परत आम्ही येत नाही” हे काळीज चिरणारे स्वर आहेत एका माऊलीचे, पण तिच्या बोलण्याला प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. ती पोटतिडकीने बोलत होती, पण तिचे ऐकणार कोण? कृष्णा माईने अनेकांचा संसार वाहून नेला, त्यानंतरही जगण्याची लढाई संपलेली नाही. सांगलीच्या बहे येथील रामलिंग बेटावर घडलेला हा प्रसंग कॅमेरात कैद झाला.

रामलिंग बेटाच्या पुलावरुन चालत जाण्यास बंदी

मोठा पूल खचल्याचे कारण देत बांधकाम विभागाने रामलिंग बेटाच्या पुलावरुन चालत जाण्यास बंदी घातली आहे. परंतु अस्मानी संकटाला तोंड देताना जनावरं आणि लहान मुलांना सांभाळणाऱ्या महिलांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आपल्यावर आलेल्या संकटांचा पाढाच वाचला.

काय म्हणाली महिला?

“घरं मोडलेली असताना साहेब आम्ही राहायचं कुठे सांगा, पोरं बाळं आहेत बारकी, ढोरं गुरं आहेत ती पाहुण्यांकडे सोडली. आणि तुम्ही इथनं आम्हाला सोडत नाही. तिकडे गाडी येते आमची. आम्ही सकाळी यायला नको होतं, ते आलो. आमची चूक झाली. उद्या येत नाही आम्ही इथे. पण आतापुरतं सोडा आम्हाला.” अशी विनवणी ती महिला करत होती.

“घरात चिखल-पाणी आहे. कुठे थांबणार आम्ही, रात्र कुठे काढणार? सकाळी बिना अन्न-पाण्याची घरं धुतली. आता जेवण पाहिजे की नाही. भुका लागल्या, कपडे भिजले, आता आम्ही कशी रात्र काढायची? इतकी घरात घाण झालेय की काही बोलायची सोय नाही. एवढं आज सोडा आम्हाला. परत येत नाही आम्ही” असंही ती म्हणाली.

यावेळी केविलवाण्या झालेल्या महिला आणि मुली तिथेच खाली बसल्या. याच पुलावरुन बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस इकडून तिकडे फेरफटका मारत होते. परंतु पूरग्रस्त लोकांना मात्र जाऊन देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी

सरणार कधी रण? मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

(Sangli Flood Victim Lady requests officer to let go from Bridge to home Video goes viral)